टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे. विराट कोहली आगामी आयपीएल 2024 मध्ये मैदानावर पुनरागमन करेल.
विराट कोहली आणि त्याची आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आजचा दिवस खूप खास आहे. विराट कोहलीनं आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत आयपीएलमध्ये 16 वर्षे पूर्ण केली. विराट कोहली जेव्हापासून आयपीएल खेळत आहे तेव्हापासून तो आरसीबीसोबतच आहे. आजपर्यंत विराट कोहली आयपीएलमध्ये आरसीबी शिवाय दुसऱ्या कोणत्याच टीमकडून खेळलेला नाही.
विराट कोहलीनं 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्याच वर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील संघानं विश्वचषक जिंकला होता. या कामगिरीच्या आधारे आरसीबीनं त्याला ऑक्शनमध्ये खरेदी केलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत विराट कोहली आयपीएलमध्ये फक्त आरसीबीकडून खेळताना दिसत आहे.
विराट कोहलीच्या याच निष्ठेचा आदर करत आरसीबीनं सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “निष्ठा ही सर्वोच्च असते. किंग कोहली, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो!” विराट कोहलीचे चाहते त्याला आरसीबीशिवाय दुसऱ्या कुठल्याच संघाच्या जर्सीत पाहू शकत नाहीत. आगामी आयपीएलमध्ये त्याला पुन्हा एकदा आरसीबीच्या जर्सीत पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
“Loyalty above all.” 🙌
We love you, King Kohli! ❤🔥#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL #16YearsOfViratKohli #ViratKohli @imVkohli pic.twitter.com/7H1mcYvWQE
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 11, 2024
आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीनं आतापर्यंत 237 सामने खेळले असून त्यात कोहलीनं 229 डावांमध्ये 7263 धावा केल्या आहेत. या कालावधीत विराट कोहलीनं 7 शतकं आणि 50 अर्धशतकं ठोकली. 2016 चा आयपीएल सीझन विराट कोहलीसाठी खूप खास होता. या मोसमात विराटच्या बॅटमधून तब्बल 973 धावा निघाल्या. हा आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.
विराट कोहलीनं अनेक वर्षे आरसीबीचं कर्णधारपद भूषवलं, परंतु तो आपल्या संघासाठी एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवू शकला नाही. विराटनं 2022 मध्ये आरसीबीचं कर्णधारपद सोडलं. तेव्हापासून दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिस आरसीबीचं नेतृत्व करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एका वर्षात 2 आयपीएल? T20 ऐवजी T10 फॉरमॅट? बीसीसीआय मोठा बदल घडवण्याच्या तयारीत
IPL 2024 चा सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडू कोण? दोघांमध्ये आहे तब्बल 23 वर्षांचं अंतर!
“रोहित शर्मानं 2025 मध्ये चेन्नईकडून खेळावं”, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ