अहमदाबाद। बुधवारी (९ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला सामना भारताचा मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहली याच्यासाठी खास ठरला असून, त्याने एक मोठा विक्रम केला आहे.
विराट या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याने सुरुवात चांगली केली होती. मात्र, त्याला लय कायम राखता आली नाही आणि तो ३० चेंडूत १८ धावा करून बाद झाला. त्याला ओडियन स्मिथने शाय होपच्या हातून झेलबाद केले.
असे असले, तरी विराटने भारतासाठी २५० वनडे डाव खेळण्याचा या सामन्यादरम्यान विक्रम केला आहे. तो वनडेत भारतासाठी २५० किंवा त्यापेक्षा अधिक डाव खेळणारा ७ वा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि युवराज सिंग यांनी केला आहे.
भारतासाठी सर्वाधिक वनडे डाव खेळण्याच्या विक्रमात सचिन अव्वल स्थानी आहे. त्याने ४५२ डाव खेळले आहेत. तर त्यापाठोपाठ द्रविडचा क्रमांक लागतो. द्रविडने ३१४ डाव खेळले आहेत.
विराटने आत्तापर्यंत २५० डावात ५८.३४ च्या सरासरीने १२३११ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४३ शतकांचा आणि ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे विराट वनडेत पहिल्या २५० डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. त्याने याबाबतीत गांगुलीला मागे टाकले आहे. विराटपूर्वी हा विक्रम गांगुलीच्या नावावर होता. गांगुलीने पहिल्या २५० डावात ९६०९ धावा केल्या होत्या. गांगुलीपाठोपाठ सचिन असून त्याने ९६०७ धावा केल्या होत्या.
भारतासाठी सर्वाधिक वनडे डाव खेळणारे खेळाडू
४५२ – सचिन तेंडुलकर
३१४ – राहुल द्रविड
३०८ – मोहम्मद अझरुद्दीन
२९७ – सौरव गांगुली
२९४ – एमएस धोनी
२७५ – युवराज सिंग
२५० – विराट कोहली
विराटचे भारतात १०० वनडे
बुधवारी झालेला सामना विराटसाठी भारतात खेळलेला १०० वा वनडे सामना होता. भारतात १०० वनडे सामने खेळण्याचा टप्पा पार करणारा तो एकूण पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर (१६४), एमएस धोनी (१३०), मोहम्मद अझरुद्दीन (११३) आणि युवराज सिंग (१११) यांनी असा कारनामा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केएल राहुल झुकेगा नहीं…! लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार ‘पुष्पा’च्या लूकमध्ये दिसतोय ‘फायर’
वेस्ट इंडिजच्या स्मिथचा भारताला दुहेरी धक्का, एकाच षटकात २ मोठ्या फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता
ज्युनियर तेंडुलकरचा रणजी करंडक स्पर्धेसाठी मुंबईच्या वरिष्ठ संघात प्रवेश !!