भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ टी२० सामन्यांची मालिका शुक्रवारपासून (१२ मार्च) सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात रोहित शर्मा, केएल राहुल आणि शिखर धवन असे तीन सलामीवीरांचे पर्याय आहेत. त्यामुळे आता यातील कोणत्या दोन खेळाडूंना सलामीवीर म्हणून अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे. असे असले तरी याबाबत पहिल्या टी२० सामन्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
भारताकडून सलामीवीर म्हणून रोहित शर्मा खेळणार हे निश्चित आहे. कारण तो संघाचा उपकर्णधारही आहे, तसेच अनुभवी खेळाडूही आहे. त्यामुळे आता त्याच्यासह सलामीला फलंदाजीसाठी केएल राहुल किंवा शिखर धवन यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल.
याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना विराट म्हणाला, ‘हे काहीसे सोपे आहे. वरच्या फळीत आमच्यासाठी केएल राहुल आणि रोहितने चांगली कामगिरी केली आहे. ते दोघे खेळाची सुरुवात करतील. तसेच जर रोहितला विश्रांती दिली किंवा केएलला एखादी दुखापत झाली तर शिखर धवन तिसरा सलामीवीर म्हणून पर्याय असेल.’
मागील काही मर्यादीत षटकांच्या मालिकेत रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळला नव्हता, त्यावेळी शिखर आणि केएल राहुलने सलामीला फलंदाजी केली होती. पण आता रोहित संघात परतल्याने शिखर आणि केएल राहुल यांच्यापैकी एकाला संघातून बाहेर रहावे लागणार, हे जवळपास निश्चित आहे.
तसेच या मालिकेसाठी सुर्यकुमार यादव, इशान किशन आणि राहुल तेवतिया या युवा खेळाडूंची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. याबद्दल विराट म्हणाला, ‘आम्ही संघात अशा खेळाडूंचा समावेश केला आहे जे फलंदाजी क्रमवारीत एक्स फॅक्टर ठरु शकतात. आम्हाला पाहायचे आहे, ते मैदानात कशी कामगिरी करतात.’
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील ५ सामन्यांची टी२० मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हे सामने अनुक्रमे १२, १४, १६, १८ आणि २० मार्च रोजी होणार असून या मालिकेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
शिखर धवन की केएल राहुल, कोणाबरोबर करणार सलामीला फलंदाजी? रोहित शर्माने दिले ‘हे’ उत्तर
‘असे’ झाले तर विराटची टीम इंडिया बनू शकते क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील अव्वल संघ