उद्यापासून(5 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या हेमिल्टन येथे होणार आहे. या सामन्यातून युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल वनडेमध्ये पदार्पण करतील, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे. तसेच केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजी करेल, असेही विराटने सांगितले.
भारताचा नियमीत सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा पोटरीच्या दुखापतीमुळे उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यातून(वनडे आणि कसोटी मालिकेतून) बाहेर पडला आहे. रविवारी न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या टी20 सामन्यात फलंदाजी करताना रोहितच्या पोटरीचा स्नायू दुखावला आहे. त्याच्याऐवजी आज मयंकची भारताच्या वनडे संघात निवड झाली आहे.
तर त्याआधीच मागील महिन्यात मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिका खेळताना खांद्याला दुखापत झाल्याने शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्यातून आधीच बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी शॉला भारताच्या वनडे संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सलामीच्या जोडीत बदल करणे भारतीय संघ व्यवस्थापनाला भाग पडले आहे.
याबद्दल न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिका सुरु होण्याआधी आज विराटने सांगितले की ‘पृथ्वी नक्कीच सलामीला फलंदाजी करेल. तसेच जो कोणी रोहितचा बदली खेळाडू असेल त्याला (अगरवालला) सलामीला फलंदाजीसाठी विचारले जाईल. केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजी करेल. आम्हाला वाटते की त्याला मधल्या फळीत खेळण्याची सवय व्हायला पाहिजे. तसेच तो यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळेल.’
याबरोबरच विराट म्हणाला की धवन आणि रोहितला दुखापती झाल्याने शॉ आणि अगरवालला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी चांगली संधी आहे.
विराट म्हणाला, ‘रोहितला दुखापत होणे हे दुर्दैवी आहे. पण त्याच्याऐवजी ज्याला संधी मिळेल त्याला दबाव हातळण्याचा अनुभव मिळेल. तसेच तो त्या दबावाचा सामना कसा करतो हे पाहण्याची संघाला संधी मिळेल. त्यामुळे रोहित आणि शिखरच्या दुखापतीकडे नकारात्मकदृष्ट्या बघण्यापेक्षा ही अन्य खेळाडूंसाठी संधी असल्याचा मी विचार करतो.’
दुखापतग्रस्त रोहित शर्माऐवजी 'या' खेळाडूची झाली भारताच्या वनडे संघात निवड
वाचा👉https://t.co/k5VBFPNLkv👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) February 4, 2020
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया; पृथ्वी शॉचे झाले पुनरागमन
वाचा👉https://t.co/CbSJANfJb5👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @PrithviShaw— Maha Sports (@Maha_Sports) February 4, 2020