---Advertisement---

शाबासकी तर द्यायलाच हवी! कोलंबोत धवनच्या टीम इंडियाने मिळवलेल्या विजयाचे सातासमुद्रापारहून विराटकडून कौतुक

On: बुधवार, जुलै 21, 2021 2:56 AM
---Advertisement---

मंगळवारी (२० जुलै) श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाने वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमानांविरुद्ध ३ विकेट्सने विजय मिळवला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यातील विजयासह भारताने वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयानंतर सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीनेही कौतुक केले.

भारताचा रोमांचक विजय
मंगळवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या वनडेत श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमारने यादव आणि दीपक चाहरने अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमारने ४४ चेंडूत ६ चौकारांसह ५३ धावा केल्या. तसेच दीपक चाहरने ८२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ६९ धावा केल्या.

याशिवाय भारताने १९३ धावांवर ७ विकेट्स गमावल्या असताना चाहरने भुवनेश्वर कुमारसह ८ व्या विकेटसाठी नाबाद ८४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे भारताने ४९.१ षटकात ३ विकेट्स राखून विजय मिळवला. भुवनेश्वर १९ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो आणि चरिथ असलंका यांनी अर्धशतके झळकावली. फर्नांडोने ५० धावांची आणि असलंकाने ६५ धावांची खेळी केली. याशिवाय चमिका करुणारत्नेने नाबाद ४४ धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेने ५० षटकांत ९ बाद २७५ धावा केल्या. भारताकडून युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच दीपक चाहरने २ विकेट घेतल्या.

विराटकडून कौतुक
एकीकडे भारताचा मर्यादीत षटकांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर असताना दुसरीकडे भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे सध्या भारताच्या कसोटी संघासह इंग्लंडमध्ये असलेल्या विराटने कोलंबोत भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाने दुसऱ्या वनडेत मिळवलेल्या विजयाचे कौतुक केले आहे.

त्याने ट्विट करत लिहिले की ‘शानदार विजय. बिकट परिस्थितीतून विजय खेचून आणण्यासाठीचे प्रयत्न अप्रतिम होते. सामना पाहायला मजा आली. दीपक चाहर आणि सुर्यकुमारचे कौतुक. दबावाखाली शानदार खेळी.’

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघाला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी, या संघाचा मंगळवारपासून काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना डरहॅम येथे सुरु झाला आहे. या सराव सामन्यासाठी पाठीच्या दुखापतीचा हलकासा त्रास होत असल्याने विराटला विश्रांती देण्यात आली आहे. विराटने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामना डरहॅममधून पाहिला.

विराट, रोहितच्या अनुपस्थितीत धवनकडे कर्णधारपद
भारताचा कसोटी संघासह विराट कोहली आणि रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यावर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या मर्यादीत षटकांचे कर्णधारपद शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. शिखरनेही या दौऱ्यातील पहिल्या दोन्ही वनडेत उत्तम नेतृत्व करताना विजय मिळवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले, कर्णधार-उपकर्णधार झाले जखमी

एका टीम इंडियाकडून दुसऱ्या टीम इंडियाला प्रोत्साहन; इंग्लंडमध्ये श्रीलंकेतील विजयाचा आनंद साजरा, पाहा व्हिडिओ

श्रीलंकेविरुद्धचा दुसऱ्या वनडेतील विजय टीम इंडियासाठी ‘विश्वविक्रमी’; ऑस्ट्रेलियाला पछाडत ‘या’ यादीत पटकावले अव्वल स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---