भारत विरुद्ध इंग्लंडच्या बहुप्रतिक्षित मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होत आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण चार सामने खेळवले जातील. या मालिकेसाठी दोन्ही संघ चेन्नईत पोहोचले असून २ फेब्रुवारीपासून ते सरावाला सुरुवात करतील.
दरम्यान, या मालिकेद्वारे भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पुनरागमन करणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून त्याने पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजेमुळे माघार घेतली होती. मात्र पुनरागमनानंतर दमदार कामगिरी करण्यासाठी विराट उत्सुक असेल. त्याचबरोबर विराटला आगामी मालिकेत काही जुने शानदार विक्रम आपल्या नावे करण्याची सुवर्णसंधी असेल.
एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडण्याची संधी
माजी कर्णधार एमएस धोनी याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण ६० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यातील २७ सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला होता. विशेष म्हणजे, विजयी सामन्यातील २१ सामने हे भारताच्या मैदानावर झाले होते. दुसरीकडे विराटने आजवर ५६ कसोटी सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत. त्यापैकी ३३ सामन्यात भारतीय संघाने विजयी पताका झळकावली आहे. यातील २० सामने मायभूमीत झाले होते.
थोडक्यात सांगायचे झाले तर, मायदेशात झालेल्या कसोटी सामन्यात धोनीने संघाला २१ आणि विराटने २० विजय मिळवून दिले आहेत. अशात कसोटी मालिकेतील २ सामने जरी विराटने जिंकले; तरी तो या मायभूमीत सर्वाधिक कसोटी जिंकण्याच्या विक्रमात धोनीला मागे टाकेल.
क्लाइव्ह लॉयड यांच्यावर ठरू शकतो वरचढ
याव्यतिरिक्त पहिल्या कसोटी सामन्यात विराटने अवघ्या १४ धावा केल्यास तो वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांना पिछाडीवर सोडेल. विराटने कर्णधार असताना आतापर्यंत ५२२० धावा केल्या आहेत. लॉयड हे ५३३३ धावांसह या विक्रमाच्या यादीत विराटच्या पुढे आहेत. त्यामुळे १४ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करत विराटला लॉयड यांना मागे टाकण्याची संधी आहे.
या विक्रमाच्या यादीत ग्रीम स्मिथ (८६५९ धावा) अव्वलस्थानी विराजमान आहेत. तर ऍलन बॉर्डर (६६२३ धावा) आणि रिकी पाँटिंग (६५४२ धावा) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
कसोटीत सर्वाधिक शतके करणारा कर्णधार होण्याची संधी
ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग यांनी कर्णधाराच्या रुपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४१ शतके केली आहेत. यासह ते सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारे पहिले कर्णधार आहेत. विराट याबाबतीत पाँटिंग यांच्या बरोबरीवर आहे. जर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने एकही शतक केले तर पाँटिंग यांचा मोठा विक्रम विराटच्या नावे होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
तेरा वर्षात भारत-इंग्लंडचा पूर्ण संघ बदलला, तरी ‘ते’ दोन खेळाडू मात्र आजही संघात कायम
…आणि पाकिस्तानी क्रिकेटरने मैदानावरच घातला क्विंटन डी कॉकशी वाद, पाहा व्हिडिओ






