आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून चार विकेट्सनं पराभव झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्पर्धेतीस प्रवास संपला. अशाप्रकारे आरसीबीचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. पराभव झाल्यानंतर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी हार न मानण्याची भावना व्यक्त केली आहे.
एलिमिनेटरमधील पराभवानंतर विराट कोहली म्हणाला, “आम्ही सलग सामने हरत असताना खेळाडू निराश झाले होते. पण नंतर आम्ही चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ लागलो. आम्ही आमच्या सन्मानासाठी खेळायला सुरुवात केली आणि आमचा आत्मविश्वासही परत आला.” तो पुढे म्हणाला, “आम्ही ज्या प्रकारे गोष्टी बदलल्या आणि प्लेऑफसाठी पात्र ठरलो ते खरोखरच खास होतं. ही गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवेन, कारण या संघातील प्रत्येक खेळाडूनं खूप उत्साह दाखवला. आम्हाला याचा अभिमान आहे. शेवटी आम्हाला जसं खेळायचं होतं तसं आम्ही खेळलो.”
कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला, “गेले सहा सामने खरोखरच खूप खास होते. जेव्हा तुम्ही काही खास करता तेव्हा तुमच्या अपेक्षाही वाढतात.” तो पुढे म्हणाला, “या हंगामाचा पूर्वार्ध निराशाजनक होता. पण एकदा लय मिळाल्यानंतर आम्ही जिंकत राहिलो. आम्ही ट्रॉफी जिंकू शकलो नाही याचं दुःख आहे. पण मला माझ्या संघाचा अभिमान आहे.”
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिल्या 8 पैकी 7 सामन्यांत पराभव झाला होता. पण, यानंतर संघानं शानदार पुनरागमन केलं आणि पुढील 6 सामने जिंकले. आरसीबीनं आपल्य शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा रोमहर्षक पराभव केला होता. या विजयानंतर संघानं प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवाचं मुख्य कारण ठरली राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी. आवेश खाननं 44 धावांत 3 बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विननं 19 धावांत 2 बळी आणि ट्रेंट बोल्टनं 16 धावांत 1 बळी घेत बंगळुरूला 172 धावांत रोखलं. प्रत्युत्तरात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांना काही विशेष कामगिरी करता आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या नात्यात दुरावा? इंस्टाग्रामवरून आडनाव हटवल्यामुळे खळबळ!
दिनेश कार्तिक पाठोपाठ आता ‘गब्बर’ही करणार क्रिकेटला अलविदा? शिखर धवनच्या निवृत्तीबाबत काय आहे अपडेट?
केएल राहुलचं करिअर धोक्यात? भारतीय संघाची काळी बाजू केली उघड…बीसीसीआय ॲक्शन घेणार का?