क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड आणि भारत या संघामध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत इंग्लंड संघाला १५१ धावांनी पराभूत केले. यासह भारताने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. सामन्यानंतर, भारतीय कर्णधार विराट कोहलीने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवणारी एक कृती करत सर्वांची मने जिंकली.
विराटने दाखवली खिलाडूवृत्ती
लॉर्ड्स कसोटी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. स्वतः कर्णधार विराट कोहली हा देखील अत्यंत आक्रमकवृत्तीने जल्लोष करत होता. मात्र, त्यानंतरही त्याने सर्वात प्रथम इंग्लंडचा अखेरचा फलंदाज जेम्स अँडरसन याच्याशी हस्तांदोलन केले. विराट व अँडरसन या दोघांमधील प्रतिस्पर्धा जगजाहीर आहे. अँडरसन हा नेहमीच आपल्या गोलंदाजीने विराटला त्रस्त करत असतो. पहिल्या कसोटीतही त्याने पहिल्याच चेंडूवर विराटला बाद करत वर्चस्व गाजवले. २०१४ दौऱ्यावेळी अँडरसनने त्याला चार वेळा बाद केलेले. परंतु, त्यानंतर २०१८ दौऱ्यावेळी तो विराटला एकदाही बाद करू शकला नव्हता.
लॉर्ड्स कसोटीत पेटला संघर्ष
लॉर्ड्स कसोटी दरम्यान जेम्स अँडरसन आणि भारतीय खेळाडूंमध्ये चांगलाच संघर्ष पेटला होता. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने अँडरसन फलंदाजी करत असताना आखूड टप्प्याच्या चेंडूंनी त्याला त्रस्त केले होते. त्यावर अँडरसनने नाराजी व्यक्त केली होती. या सामन्यावेळी मोहम्मद सिराज व जॉनी बेअरस्टो, बुमराह-रॉबिन्सन यांच्यादरम्यान ही द्वंद रंगले होते.
भारताचा शानदार विजय
भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटीच्या अखेरच्या दिवशी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. अखेरच्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचे पारडे जड होते. मात्र, बुमराह व शमी यांच्या नाबाद भागीदारीमूळे भारताने सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर, वेगवान गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय संघाने इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळत १५१ धावांनी संस्मरणीय विजय मिळवला. मालिकेतील तिसरा सामना २५ ऑगस्टपासून खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानात घुसलेल्या ‘त्या’ प्रेक्षकाला जडेजाने विचारलेला ‘हा’ प्रश्न
भारीच! ऐतिहासिक विजयानंतर विराटसेनेला लॉर्ड्स ग्राउंडकडूनही मिळाल्या खास शुभेच्छा
इंग्लिश माध्यमांमध्ये भारतीय संघाचे गुणगान, तर इंग्लड खेळाडूंवर बोचरी टिका, फोटो तुफान व्हायरल






