अहमदाबाद। भारताने शनिवारी इंग्लंडविरुद्ध ५ वा टी२० सामना ३६ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेली टी२० मालिकाही ३-२ अशा फरकाने जिंकली. या सामन्यापूर्वी मालिकेत २-२ अशी बरोबरी होती. त्यामुळे ५ वा सामना निर्णायक होता. या निर्णायक सामन्यात विजय मिळवत भारताने सलग ६ वा टी२० मालिका विजय मिळवला आहे. या विजयानंतर मालिका विजयाची ट्रॉफी कर्णधार कोहलीने संघातील नवोदित खेळाडू सुर्यकुमार आणि इशान किशनकडे सोपवली.
भारताचा झाला विजय
पाचव्या टी२० सामन्यात भारताकडून रोहित शर्माने ६४ आणि विराट कोहलीने नाबाद ८० धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सुर्यकुमार यादवने ३२ आणि हार्दिक पंड्याने ३९ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ बाद २२४ धावा करता आल्या.
भारताने इंग्लंडला २२५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकात ८ बाद १८८ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून जोस बटलर(५२) आणि डेव्हिड मलानने(६८) अर्धशतके केली. मात्र, अन्य फलंदाजांना फार काही करता आले नाही. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमारने २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या आणि टी नटराजनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
विराटने नवोदीत खेळाडूंकडे सोपवली ट्रॉफी
खरंतर मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघात एक प्रथा पडलेली दिसून आली आहे. ज्यात मालिका जिंकल्यानंतर कर्णधार ती मालिका विजयाची ट्रॉफी संघातील नवोदीत किंवा युवा खेळाडूकडे सोपवतो. त्यानंतर ते नवोदीत किंवा युवा खेळाडू ती ट्रॉफी उंचावतात. यावेळीही वेगळे काही पाहायला मिळाले नाही. विराटने मालिका विजयाची ट्रॉफी स्विकारल्यानंतर ती सुर्यकुमार आणि इशान किशन यांच्या हाती सोपवली. त्यानंतर ती ट्रॉफी सुर्यकुमार आणि इशानने वर उंचावली.
C.H.A.M.P.I.O.N.S! 🏆🏆#TeamIndia @GCAMotera #INDvENG @Paytm pic.twitter.com/V0zCW4BugT
— BCCI (@BCCI) March 20, 2021
इशान आणि सुर्यकुमारचे इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण
इशान आणि सुर्यकुमार यांनी इंग्लंडविरुद्धच्या या टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या दोघांनीही मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात इशानने अर्धशतकी खेळी केली. मात्र सुर्यकुमारला फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र त्याला चौथ्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली. त्यानेही ही संधी दोन्ही हातांनी झेलत पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिमाखात आपल्या आगमनाचे बिगूल वाजवले. त्याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय डावात अर्धशतक केले.
सुर्यकुमारला वनडे मालिकेसाठीही संधी
इंग्लड आणि भारत संघात आता २३ मार्चपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठीही सुर्यकुमारला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२०मध्ये ‘कर्णधार’ कोहलीचीच हवा! विलियम्सन, फिंच, मॉर्गन सर्वांनाच वरचढ ठरत गाठला अव्वल क्रमांक
वनडेपाठोपाठ टी२० मालिकेत टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात; दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या सामन्यात मोठा विजय
‘कर्णधार’ कोहलीचा नवा विश्वविक्रम! केन विलियम्सनला मागे टाकल मिळवले पहिले स्थान