इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २६ मार्च ते २९ मे दरम्यान भारतातील पुणे आणि मुंबई शहरात आयपीएलचे सामने खेळले जाणार आहे. या हंगामादरम्यान क्रिकेटपटू वेगवेगळ्या विभागात जबरदस्त प्रदर्शन करत नवनवे विक्रम आपल्या नावावर करतील. तसेच काही जुने विक्रमही मोडताना दिसतील. दरम्यान एका विक्रमावर आयपीएलप्रेमी आणि सर्व फ्रँचायझींच्या कर्णधारांचे लक्ष असेल. हा विक्रम आहे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांचा.
कोण आहे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा (Most Runs In IPL As Captain) कर्णधार?
आयपीएलच्या १४ हंगामांच्या इतिहासात, सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आहे. त्याने २००८ सालीच बेंगलोर संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. परंतु बेंगलोरच्या नेतृत्त्वपदी त्याची वर्णी लागली ती, २०१३ मध्ये. २०१३ पासून ते २०२१ पर्यंत बेंगलोर संघाचे नेतृत्त्वपद सांभाळताना त्याने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. त्याने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये ४८८१ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, फक्त कर्णधार म्हणूनच नाही, तर फलंदाज म्हणूनही आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटच्याच नावे आहे.
मात्र येत्या आयपीएल २०२२ च्या हंगामापासून तो या टी२० लीगमध्ये केवळ खेळाडू म्हणून मैदानावर उतरेल. त्यामुळे इतर कर्णधारांकडे त्याचा हा विक्रम मोडित काढण्याची संधी असेल. विराटने २०२१ हंगामानंतर आयपीएलमधील बेंगलोर संघाच्या नेतृत्त्वपदाचा राजीनामा दिला होता.
विराटनंतर हे कर्णधार आहेत यादीत
विराटनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत कर्णधार म्हणून ४४५६ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर ३५१८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढे आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावे ३४०६ धावा आहेत. तसेच सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेविड वॉर्नर २८४० धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे टॉप-७ खेळाडू:
४८८१ धावा – विराट कोहली
४४५६ धावा – एमएस धोनी
३५१८ धावा – गौतम गंभीर
३४०६ धावा – रोहित शर्मा
२८४० धावा – डेविड वॉर्नर
१९०० धावा – ऍडम गिलख्रिस्ट
१७२३ धावा – सचिन तेंडूलकर
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज, एकाने तर तब्बल ३ वेळा केलाय पराक्रम
ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा! सेमीफायनलच्या तिकीटासह ‘या’ विक्रमावर कोरलं नाव