भारतीय कर्णधार विराट कोहली मैदानावर जसा त्याच्या फलंदाजीने राज्य करतो तसाच तो त्याच्या चाहत्यांच्या मनावरही करतो. याचा प्रत्यय नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या मालिकेदरम्यान विमानतळावर तो जेव्हा कशाचीही पर्वा न करता लहान मुलांना भेटला त्यावरून आला.
विराट विमानतळावर असताना त्याला व्हीलचेअरवर काही लहान मुले त्याचे नाव घेत असल्याचे दिसली. त्याचवेळी तो सुरक्षेची आणि गर्दीची पर्वा न करता त्या मुलांजवळ गेला आणि त्या प्रत्येक मुलाला भेटला. विराटने या मुलांबरोबर सेल्फी काढून त्यांना एक सुंदर आठवण दिली.
या लहान मुलांनी विराटला हाताने बनवलेली काही चित्रे भेट दिली. विराटने त्यांना स्वाक्षरी दिली आणि त्यांच्या बरोबर हात मिळवला.
विराटचा चाहता वर्ग मोठा आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे आणि विराटही कधी त्याच्या छोट्या चाहत्यांना नाराज करत नाही. तो बऱ्याचदा लहान मुलांबरोबर सेल्फी घेताना दिसतो. या वेळीही त्याने या लहान मुलांना नाराज केले नाही.
भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी २० मालिकेत २-१ ने विजय मिळवला आहे. आता भारतीय संघ १६ नोव्हेंबर पासून श्रीलंका विरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.