भारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवून देण्यात सिहांचा वाटा उचलला. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताला ६ षटकात ४८ धावा करायच्या होता. त्यातील २२ धावा एकट्या विराट कोहलीने केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. भारताकडून त्याने या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या.
विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूपैकी एक आहे. विराट एका फॉरमॅटमध्ये नाही तर सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करतो आणि भारताला विजयी पथावर नेतो. बाकी फॉरमॅटमध्ये कदाचित विराटपेक्षा स्मिथ किंवा रूट चांगले खेळत असतील पण टी२० मध्ये विराट कोहलीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. मागील दोन्ही टी२० विश्वचषकामध्ये विराट मालिकावीर होता, यावरून हे दिसून येते की विराटने या फॉरमॅटमध्ये नियमितपणे चांगला खेळ केला आहे.
विराटने टी२० मध्ये ५१ सामन्यात ५४ च्या सरासरीने १८५२ धावा केल्या आहेत, ज्यात त्याने १७ अर्धशतके ही केली आहेत. आपल्या सर्वांनाच माहित आहे की विराट वनडेमध्ये श्रीलंके विरुद्ध चांगली कामगिरी करतो, पण टी२० मध्ये विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराटने १० सामने खेळले आहेत ज्यात त्याने ७० च्या सरासरीने ४४३ धावा केल्या आहेत ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील ५ टी२० सामन्यात त्याची सरासरी ३००ची आहे. त्यातील ३ सामन्यात त्याला सामनावीराचा किताब मिळाला आहे.