सेंच्युरियन। भारताचा कर्णधार विराट कोहली आणि विक्रम हे आता समीकरणच बनले आहे. विराट जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तो काहीतरी विक्रम करताच असतो. आजही त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळताना नाबाद शतक करून खास विक्रम रचले आहेत.
विराटने आज आंतराष्ट्रीय कारकिर्दीत १७००० धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच तो हा टप्पा सर्वात जलद गाठणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ३६३ डावात ही कामगिरी केली आहे. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमलाच्या नावावर होता. अमलाने ३८१ डावात १७००० धावा केल्या होत्या.
तसेच हा १७००० धावांचा टप्पा गाठणारा विराट फक्त पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला आहे.
याबरोबरच विराटने वनडे कारकिर्दीत ९५०० धावांचाही टप्पा पार केला आहे. या सामन्याआधी त्याला हा टप्पा पार करण्यासाठी ४१ धावांची गरज होती. तसेच तो दक्षिण आफ्रिका विरुद्ध चौथ्या वनडेत खेळताना भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला होता. त्याने मोहम्मद अझरूद्दीन यांचा ९३३४ सामन्यात ९३७८ धावांचा विक्रम मोडला होता.
त्याचबरोबर विराटने आज वनडेतील ३५ वे शतक केले आहे. याबरोबरच द्विपक्षीय वनडे मालिकेत ५०० पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू देखील ठरला आहे. तसेच तो अजूनही नाबाद खेळात असून भारतासमोर सहाव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेने २०५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
आंतराष्ट्रीय कारकिर्दीत १७००० धावा करणारे भारतीय खेळाडू
सचिन तेंडुलकर
राहुल द्रविड
सौरव गांगुली
वीरेंद्र सेहवाग
विराट कोहली*
वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
सचिन तेंडुलकर: १८४२६ धावा, ४६३ सामने
सौरव गांगुली: ११३६३ धावा, ३११ सामने
राहुल द्रविड: १०८४३ धावा, ३४१ सामने
एम एस धोनी* : ९९६७ धावा, ३१८ सामने
विराट कोहली*: ९५५१* धावा, २०८ सामने






