इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. साखळी फेरी सामन्यांतील दमदार कामगिरीच्या जोरावर प्लेऑफमध्ये धडक मारणाऱ्या ४ संघांपैकी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाचा प्रवास संपला आहे. विराट कोहलीसाठी हा बेंगलोर संघाचा कर्णधार म्हणून अंतिम हंगाम होता. त्यामुळे कर्णधाराच्या रुपात आपल्या संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. परंतु कोहली एकटा असा भारतीय कर्णधार नाही, ज्याच्या वाट्याला आयपीएलचे जेतेपद आलेले नाही. यामध्ये बऱ्याचशा दिग्गज खेळाडूंचीही नावे येतात.
साखळी फेरी सामन्यांतील दमदार प्रदर्शनाच्या जोरावर प्लेऑफमध्ये धडक मारणाऱ्या बेंगलोर संघाला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी फक्त एक संधी मिळाली होती. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा एलिमिनेटर सामना जिंकत त्यांना अंतिम सामन्यात पोहोचता आले असते. परंतु कोलकाताने ४ विकेट्स राखून त्यांचा पराभव केल्याने बेंगलोर संघ आयपीएल २०२१ मधून बाहेर झाला आहे. अशाप्रकारे पुन्हा एकदा बेंगलोरचा कर्णधार विराटला जेतेपदापासून वंचित राहावे लागले आहे.
विराटपूर्वी सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्यासारखे दिग्गजही त्यांच्या आयपीएल संघांना विजेता बनवण्यात अपयशी ठरले होते.
या नकोशा विक्रमाच्या यादीत विराटचे नाव सर्वात वर येते. कारण विराट २०१३ पासून या संघाचा संघनायक राहिला आहे. मात्र ८ वर्षांच्या या कारकिर्दीत १४० सामन्यात संघाचे नेतृत्त्व करुनही त्याला एकदाही आयपीएल चषकावर आपले नाव कोरता आले नाही.
विराटनंतर या यादीत दुसरे नाव येते ते, विरेंद्र सेहवाग याचे. दिल्ली डेअरडेविल्स (आताची दिल्ली कॅपिटल्स) संघाचे नेतृत्त्वपद सांभाळताना सेहवागच्या कारकिर्दीचा अंतही निराशेनेच झाला होता. तब्बल ५२ सामन्यांमध्ये दिल्ली संघाचे नेतृत्त्व केल्यानंतरही तो संघाला विजेता बनवू शकला नव्हता.
सेहवागबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचीही आयपीएल संघाच्या कर्णधाराच्या रुपातील कारकिर्द विशेष राहिली नाही. त्याने मुंबई इंडियन्सचे ५१ सामन्यात नेतृत्त्व केले होते. परंतु त्यालाही चषकावर संघाचे नाव कोरता आले नाही. राहुल द्रविडचेही या यादीत नाव येते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांचे नेतृत्त्व करणाऱ्या राहुलच्या कारकिर्दीचा अंतही निराशेनेच झाला. एकूण ४८ सामन्यांमध्ये (३४ राजस्थान आणि १४ बेंगलोर) कर्णधार असणाऱ्या द्रविडला आपल्या संघाला आयपीएलचा अंतिम सामना मात्र जिंकवता आला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकातील सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडिया ‘या’ दोन बलाढ्य संघांशी करणार दोन हात
टी२० विश्वचषकासाठी जाण्यापूर्वी कमिन्सच्या घरी चिमुकल्याचे आगमन, क्यूट व्हिडिओसह दिली माहिती