भारताने वनडे सीरीजच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडीजला 8 विकेट्सने हरवून पाच सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली आहे.टीम इंडियाने मालिकेत 3-1 ने विजय मिळवला आहे.यासोबतच वेस्ट इंडीजमध्ये सलग तीन वनडे सीरीज जिंकण्याची कामगिरी भारतीय संघाने केली आहे. विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर विंडीजचं २०६ धावांचं आव्हान भारतानं ३७व्या षटकातच पार केलं.
टीम इंडियानं केवळ दोन गडी गमावून विंडीजचं २०६ धावांचं लक्ष्य पार केलं. सलामीवीर शिखर धवन पहिल्याच षटकात अवघ्या ४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे व कर्णधार विराट कोहलीनं भारताचा डाव सावरला. रहाणे ३९ धावांवर असताना बिशूच्या एका चेंडूवर पायचित झाला. रहाणे तंबूत परतल्यानंतर विराट व दिनेश कार्तिकनं सर्व सूत्रे हाती घेत भारताचा विजय साकार केला. कोहलीनं ११५ चेंडूत नाबाद १११ धावा केल्या तर, दिनेश कार्तिकनं ५२ चेंडूत ५० धावा केल्या.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतासमोर २०६ धावांचं आव्हान ठेवलं होत चांगल्या सुरुवातीनंतर नेहमीप्रमाणे विंडिजची घसरगुंडी उडाली, मात्र अखेरच्या षटकात विंडिजच्या फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळीने संघाने २०० धावांचा टप्पा गाठला. त्याआधी भारतीय गोलंदाजांनी विंडिजच्या फलंदाजीचा कणाच मोडून टाकला. चांगली सुरुवात होऊनही या सामन्यात विंडिजचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरले. विंडिजकडून शाई होपने ५१ तर कायले होपने ४६ धावांची खेळी केली आहे. दोन्ही सलामीवीरांनी विंडिजला सावध सुरुवात करुन दिली होती. मात्र विंडिज मोठी धावसंख्या उभारणार अस वाटत असतानाच हार्दीक पांड्याने विंडिजला पहिला धक्का दिला….आणि त्यानंतर सुरु झालेली पडझड काही केल्या थांबलीच नाही.