केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज तिसरा आणि निर्णायक टी २० सामना सुरु आहे. पण भारताला सामना सुरु होण्याआधीच एक धक्का बसला आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीचा आज ११ जणांच्या भारतीय संघात समावेश नाही .
विराटला पाठीची दुखापत(stiff back) झाल्याने तो आज संघाबाहेर आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. आज महत्वाच्याच सामन्यासाठी अफलातून फॉर्ममध्ये असणाऱ्या विराटला मुकावे लागले आहे.
त्याचबरोबर आज विराटला आंतराष्ट्रीय टी२० मध्ये २००० धावा पूर्ण करण्याची संधी होती. परंतु आता त्याला हा विक्रम करण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
सध्या विराट आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल स्थानी मार्टिन गप्टिल तर दुसऱ्या स्थानी ब्रेंडन मॅक्युलम हे दोन न्यूझीलंडचे फलंदाज आहेत.
विराटने दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण दौऱ्यात ऊत्तम कामगिरी केली आहे. त्याने या दौऱ्यात ४ शतके आणि २ अर्धशतकांसह ८७१ धावा केल्या आहेत.
आज भारतीय संघात विराटशिवाय ३ बदल करण्यात आले आहेत. आज ११ जणांच्या भारतीय संघात दिनेश कार्तिक, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहला संधी मिळाली आहे. आज सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
असा आहे ११ जणांचा भारतीय संघ: रोहित शर्मा(कर्णधार),शिखर धवन, सुरेश रैना, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, मनीष पांडे, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर.