टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) ऍडलेड येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात खेळला जाणार आहे. हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयाची अपेक्षा असेल. स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असलेला विराट कोहली या सामन्यात देखील चमकदार कामगिरी करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण, हा सामना ज्या ऍडलेड ओव्हल मैदानावर होत आहे, त्या मैदानावर विराट कोहलीची आजवरची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली आहे.
भारतीय संघ 2016 टी20 विश्वचषकानंतर प्रथमच उपांत्य फेरी खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची मदार बऱ्यापैकी विराट कोहली याच्यावर अवलंबून असेल. कारण, विराटने या संपूर्ण स्पर्धेत विरोधी संघांची गोलंदाजी फोडून काढली आहे. तो या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने या पाच सामन्यात 123 च्या अविश्वासनीय सरासरीने 246 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 138 असा असून, त्याने स्पर्धेत तीन अर्धशतके ठोकलीत. यासोबतच तो स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील आहे.
विराटची केवळ ऍडलेड ओव्हल येथील टी20 सामन्याची आकडेवारी लक्षात घेतल्यास दिसून येते की, तो या मैदानावर धावा काढण्यासाठी उत्सुक असतो. त्याने या मैदानावर दोन टी20 सामने खेळताना 154 धावा केल्या असून त्यात तो एकदाही बाद झालेला नाही. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 90 तर, याच विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध त्याने 64 धावांची नाबाद खेळी केली होती. याव्यतिरिक्त कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याच्या नावे या मैदानावर तीन, तर वनडेत एक शतक आहे. त्याच्या या मैदानावरील एकूण आकडेवारीचा विचार केल्यास त्याने 75.58 च्या सरासरीने 907 धावा केल्या आहेत. (virat kohli outstanding stats at adelaide oval)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर अन् रिझवानने भल्याभल्यांना दाखवली आपली ताकद, टी20 विश्वचषकाच्या ‘या’ विक्रमात बनलेत टेबल टॉपर
अर्रर्र! पंचांनी एकाच फलंदाजाला 2 चेंडूंवर दोन वेळा दिले आऊट, पण असं घडलं तरी कसं?