विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सध्या प्लेऑफ रेसच्या कोंडीत अडकला आहे. आरसीबीनं या हंगामात आतापर्यंत 13 पैकी 6 सामन्यांत विजय नोंदवलेत. ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. आरसीबीचा लीग टप्प्यातील शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आहे.
आयपीएल 2024 हा पहिला सामना देखील या दोन संघांमध्ये झाला होता. या सामन्यात चेन्नईनं 6 गडी राखून विजय मिळवला होता. आता बंगळुरूसाठी चांगली गोष्ट म्हणजे, त्यांचा चेन्नईविरुद्धचा सामना 18 मे रोजी होणार आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, विराट कोहलीचा या तारखेशी फार जुना संबंध आहे. या तारखेला झालेल्या जवळजवळ प्रत्येक सामन्यात त्याच्या बॅटमधून भरपूर धावा निघाल्या आहेत.
आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली 18 मे रोजी चार वेळा सामने खेळला. या चार सामन्यांमध्ये त्यानं 2 शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. या दिवशी खेळलेल्या 4 सामन्यांत त्यानं 98.7 च्या अविश्वसनीय सरासरीनं 296 धावा ठोकल्या आहेत. या दिवशी विराट कोहलीनं आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. या सामन्यात त्यानं 63 चेंडूत 100 धावांची शानदार खेळी खेळली होती.
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 18 मे रोजी जेव्हाही सामना झाला, त्या सामन्यात संघानं विजय नोंदवला आहे. या दिवशी आरसीबीनं 2013 आणि 2014 मध्ये चेन्नईविरुद्ध सामने खेळले होते. या दोन्ही सामन्यात संघ विजयी झाला होता. त्यानंतर 2016 मध्ये आरसीबीनं पंजाब किंग्जचा पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीनं केवळ 50 चेंडूत 113 धावांची तुफानी खेळी खेळली होती. आरसीबीनं 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळलेल्या सामन्यात देखील विजय नोदवला होता.
जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल, तर त्यांना चेन्नई सुपर किंग्जला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावं लागेल. आरसीबीचे सध्या 12 गुण आहेत. सीएसकेविरुद्धच्या विजयानंतर त्यांचे 14 गुण होतील. पण बंगळुरू प्लेऑफसाठी केवळ चेन्नईविरुद्धच्या विजयावर अवलंबून नाही. टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आरसीबीला आशा करावी लागेल की, सनरायझर्स हैदराबाद किंवा लखनऊ सुपर जायंट्स आपले उर्वरित दोन्ही सामने गमावतील.
महत्त्वाच्या बातम्या –
पावसामुळे सामना रद्द, चाहत्यांचे पैसे मिळणार परत; गुजरात टायटन्स संघाची घोषणा
टी20 विश्वचषकासाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा, शाकिब नाही तर ‘या’ युवा खेळाडूकडे नेतृत्व