पार्ल। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात बुधवारपासून (१९ जानेवारी) तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली. बोलंड पार्क, पार्ल येथे पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताचे नेतृत्त्व केएल राहुल (KL Rahul) करत होता. तर, गेले ५ वर्षे कर्णधाराच्या रुपात खेळलेला विराट कोहली (Virat Kohli) केवळ खेळाडूच्या भूमिकेत दिसला. यामुळे एक खास आकडेवारी समोर आली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून दूर करण्यात आले होते. त्यामुळे, त्याच्याऐवजी वनडे संघाचा रोहित शर्माला नियमित कर्णधार आणि केएल राहुलला नियमित उपकर्णधार करण्यात आले होते. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारताचा नियमित मर्यादीत षटकांचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकावे लागले. यामुळेच वनडे मालिकेत केएल राहुलला प्रभारी कर्णधारपद देण्यात आले.
तसेच विराटला वनडे कर्णधारपदावरून काढण्यापूर्वी त्याने नोव्हेंबर २०२० मध्ये भारताच्या टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडले होते, तर १५ जानेवारी २०२२ रोजी विराटने कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. त्यामुळे तो आता भारताकडून केवळ खेळाडू म्हणून खेळताना दिसत आहे. वनडेत तो बुधवारी तब्बल ५ वर्षांनी केवळ खेळाडू म्हणून खेळताना दिसला.
विशेष म्हणजे बुधवारी विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली सामना खेळला. यापूर्वी विराट बऱ्याच कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे, मात्र ते सर्व कर्णधार विराटपेक्षा वयाने मोठे होते. मात्र, बुधवारी जेव्हा विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत खेळण्यासाठी उतरला तेव्हा तो त्याच्यापेक्षा लहान असलेल्या केएल राहुलच्या नेतृत्त्वात खेळताना दिसला. बुधवारी, विराटचे वय ३३ वर्षे ७५ दिवस होते, तर केएल राहुलचे २९ वर्षे २७६ दिवस होते.
अधिक वाचा – विराट आयुष्यात कधीच विसरणार नाही ‘जानेवारी’, आफ्रिकेविरुद्ध मैदानावर उतरताच बनणार खास रेकॉर्ड
वनडेत ६ कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली खेळताय विराट
विराट कोहलीसाठी त्याच्या वनडे कारकिर्दीतील केएल राहुल हा ६ वा कर्णधार ठरल्या, ज्याच्या नेतृत्त्वाखाली तो सामना खेळला. यापूर्वी विराटने स्वत: व्यतिरिक्त विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सुरेश रैना आणि गौतम गंभीरच्या नेतृत्त्वाखाली वनडे सामने खेळले आहेत.
विराटने धोनीच्या नेतृत्त्वाखाली सर्वाधिक १३८ वनडे सामने खेळले आहेत. तसेच त्याने सेहवागच्या नेतृत्त्वाखाली ६ वनडे, रैनाच्या नेतृत्त्वाखाली ९ वनडे, गंभीरच्या नेतृत्त्वाखाली ६ सामने खेळले आहेत. त्याचबरोबर तो स्वत: कर्णधार असताना विराटने ९५ वनडे सामने खेळले आहेत.
व्हिडिओ पाहा – विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव
विराटची कामगिरी
विराटने आत्तापर्यंत २५४ वनडे सामने खेळले आहेत. यातील ९५ सामने त्याने कर्णधार म्हणून खेळले आहेत, तर १५९ सामने त्याने केवळ खेळाडू म्हणून खेळले आहेत. त्याने केवळ खेळाडू म्हणून खेळताना ५१.२९ च्या सरासरीने ६७२० धावा केल्या आहेत. यामध्ये विराटने २२ शतके आणि ३५ अर्धशतके केली आहेत. तसेच १८३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी मालिका गमावूनही कोहली, बुमराहची आयसीसी क्रमवारीत ‘उंच उडी’, रोहितही टॉप-१० मध्ये
वीरेंद्र सेहवाग पुन्हा दिसणार कर्णधाराच्या भूमिकेत, या स्पर्धेत करणार भारताचे नेतृत्त्व
ICC टी२० ‘टीम ऑफ दी ईयर’ जाहीर! यादी पाहून टीम इंडियाचे चाहते खवळले; एक पण भारतीय कसा नाही?