रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीनं रविवारी एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला. आयपीएल 2024 च्या 62व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात उतरताच त्यानं हा इतिहास रचला.
विराट कोहलीचा हा 250वा आयपीएल सामना आहे. तो आयपीएलमध्ये आरसीबी व्यतिरिक्त इतर कोणत्याही फ्रेंचायझीसाठी खेळलेला नाही. अशाप्रकारे कोणत्याही एका लीगमध्ये एका संघासाठी 250 सामने खेळणारा कोहली हा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. तो 2008 पासून आरसीबीचा भाग आहे.
यासह विराट कोहली आयपीएलमध्ये 250 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा चौथा खेळाडू ठरला आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याचा विक्रम आहे. त्यानं आयपीएलमध्ये 263 सामने खेळले आहेत. त्यापाठोपाठ मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा (256) आणि आरसीबीचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक (255) यांचा क्रमांक लागतो. मात्र धोनी, रोहित आणि कार्तिक हे आयपीएलमध्ये दोन किंवा अधिक संघांसाठी खेळले आहेत.
विराट कोहलीनं आरसीबीसाठी आतापर्यंत खेळलेल्या 249 सामन्यांमध्ये 38.71 ची सरासरी आणि 131.64 च्या स्ट्राइक रेटनं 7897 धावा केल्या आहेत. या दरम्यान तो 37 वेळा नाबाद राहिला. त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 113 धावा आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावे 8 शतकं आणि 55 अर्धशतकं आहेत. एका लीगमध्ये कोणत्याही क्रिकेटपटूचे हे सर्वाधिक शतकं आहेत.
आयपीएल 2024 मध्ये विराट कोहली तुफान फार्मात आहे. तो सध्या या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराट कोहलीनं आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 661 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 66.10 आणि स्ट्राईक रेट 155.16 एवढा राहिला. विराट कोहलीनं या हंगामात 1 शतक आणि 5 अर्धशतकंही झळकावली आहेत. याशिवाय त्याच्या बॅटमधून 56 चौकार आणि 33 षटकार निघाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आधी विराटनं चौकार-षटकार लगावत छेडलं, मग इशांत शर्मानं घेतला बदला; दोघांचा मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच
रवींद्र जडेजाला हुशारी पडली महागात, राजस्थानविरुद्ध क्रिकेटच्या ‘या’ नियमामुळे झाला बाद; जाणून घ्या
चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर ऋतुराज गायकवाडची कमाल, चेन्नईचा राजस्थानवर शानदार विजय