भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारी (२५ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात यजमान भारताने पाहुण्या इंग्लंडवर १० विकेट्सने मात केली. यासह भारतीय संघ सध्या २-१ ने मालिकेत आघाडीवर आहे. भारताच्या या विजयात फिरकीपटूंनी महत्त्वपुर्ण भूमिका बजावली. त्यातही अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने मोलाचे योगदान दिले. यानंतर आता कर्णधार विराट कोहलीने अश्विनचे तोंडभरून कौतुक केले आहे.
अश्विनविषयी बोलताना कोहली म्हणाला की, “खरोखरच अश्विनची प्रशंसा केलीच पाहिजे. तो कसोटी क्रिकेटमध्ये आधुनिक युगातील महान क्रिकेटपटू आहे. एका कर्णधाराच्या रुपात मी खूप आनंदी आहे की, अश्विनसारखा खेळाडू माझ्या संघाचा भाग आहे.”
कसोटीतील ४०० विकेट्सचा आकडा पार
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्धही अश्विन कमालीच्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ४ अशा मिळून त्याने एकूण ७ विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नव्हे तर, अश्विनने तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात जोफ्रा आर्चरला बाद करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ४००वी विकेट घेतली. यासह कसोटी क्रिकेटमधील कित्येक मोठे विक्रम त्याने आपल्या नावे केले आहेत.
अश्विनच्या भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील त्याच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यातील ५ डावात फलंदाजी करताना त्याने १७६ धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने सर्वाधिक २४ विकेट्सही चटकावल्या आहेत.