गुरुवार रोजी (२२ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा दबदबा पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२१ च्या या सोळाव्या सामन्यात बेंगलोरने १० विकेट्सने एकहाती विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्याने राजस्थानला १७७ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर देवदत्त पड्डीकल यांनी दिमाखात राजस्थानचे लक्ष्य पूर्ण केले.
दरम्यान कोहलीचे या हंगामातील पहिलेवहिले अर्धशतक पाहायला मिळाले. धावांची पन्नासी पार केल्यानंतर त्याने अतिशय प्रेमळ सेलिब्रेशन करत आपल्या जिवलग व्यक्तीला हे अर्धशतक समर्पित केले.
त्याचे झाले असे की, सलामीला फलंदाजीला उतरलेल्या विराटने ३४ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. १२ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार मारल्यानंतर पुढील चेंडूवर एक धाव घेत त्याने अर्धशतक पूर्ण केले.
या हंगामातील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने डगआउटकडे बॅट दाखवत जल्लोष साजरा केला. पुढे फ्लाइंग किस दिली आणि छातीवर हात ठोकत माझ्या हृद्यातील व्यक्तीसाठी हे सर्वकाही होते असा इशारा त्याने केला. एवढेच नव्हे तर, सर्वांपुढे त्याने ती हृद्यातील व्यक्ती माझी लाडकी लेक वामिका असल्याचेही सांगितले. त्याच्या या प्रेमळ सेलिब्रेशनचे सोशल मीडियावर चहूबाजूंनी कौतुक होत आहे.
परंतु यावेळी विराटची मुलगी वामिका आणि पत्नी अनुष्का सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित नव्हत्या. बीसीसीआयने खेळाडूंच्या कुटुंबीयांना त्यांच्यासोबत राहण्याची आणि स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी जाण्याची परवानगी दिली आहे. परंतु वामिका अजून लहान असल्याने आणि खबरदारीचा उपाय म्हणून अनुष्का आतापर्यंत बेंगलोरचा एकही सामना बघण्यासाठी स्टेडियममध्ये गेली नाही.
https://www.instagram.com/p/CN-f-0Ll4mb/?igshid=42wfxclg884j
https://twitter.com/CricketUnlimi/status/1385284715205201921?s=20
विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
दरम्यान अर्धशतक झळकावताच विराटने आयपीएल इतिहासातील मोठ्या विक्रमाचीही आपल्या नावे नोंद केली आहे. ४७ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावा करत त्याने आयपीएलमधील ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा पार करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी आयपीएलमध्ये कोणालाही ६००० धावा करता आलेल्या नाहीत. विराटने १९६ व्या आयपीएल सामन्यात खेळताना हा कारनामा केला आहे. यात त्याच्या ५ शतकांचा आणि ४० अर्धशतकांचाही समावेश आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत (२२ एप्रिलपर्यंत) विराट पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ५४४८ धावांसह सुरेश रैना आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ५४२८ धावांसह शिखर धवन आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे डेविड वॉर्नर आणि रोहित शर्मा आहेत. वॉर्नरने ५३८४ धावा केल्या आहेत. तर रोहितने ५३६८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वा रे भावा! शतक ठोकताच २० वर्षीय पडीक्कलने मिळवले ‘या’ खास विक्रमाच्या यादीत तिसरे स्थान