भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. विराटने आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी जाहीर केले होते की, तो आगामी टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. तसेच आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होताच त्याने स्पष्ट केले होते की, आयपीएलचा चालू हंगाम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या कर्णधाराच्या रूपातील त्याचा शेवटचा हंगाम असणार आहे. विराट पुढच्या वर्षी आरसीबीसोबत खेळाडूच्या रूपात जोडला जाईल. अशात आता विराटने त्याच्या या निर्णयाबाबत अजून एक खुलासा केला आहे.
कोहलीच्या या निर्णयांनंतर क्रिकेटजगतात खूप चर्चा झाल्या होत्या. आता या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. विराटने खुलासा केला आहे की, आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याबाबत त्याने सहकारी आणि त्याचा चांगला मित्र एबी डिव्हिलियर्सशी चर्चा केली होती. त्याला शांततापूर्ण वातावरण हवे होते आणि याच कराणास्तव त्याला आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असेही विराटने स्पष्ट केले आहे.
विराट स्टार स्पोर्ट्सशी बोलत होता. तो यावेळी म्हणाला की, “या निर्णयाबाबत मी २०१९ मध्ये एबी डिव्हिलियर्सशी बोललो होतो. आयपीएलमध्ये मी नेहमी अशा जागेवर होतो, जेथे मला शांततापूर्ण वातावरण बनवायचे होते. आमच्यामध्ये याबाबत चर्चा झाली तेव्हा मी विचार केला की, याला अजून एक वर्ष देऊ. संघ व्यवस्थापनामध्ये बदल झाला आणि २०२० मध्ये गोष्टी अधिक चांगल्या झाल्या होत्या. त्यावर्षी मला थोडा अधिक आराम जाणवला.”
आयपीएल २०२१ मध्ये कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबीचा विचार केला तर, संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. आरसीबीने यावर्षी काही सामन्यात अप्रतिम विजयही मिळवले आहेत. चालू हंगामात आरसीबीने १४ सामन्यांपैकी ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि १८ गुणांसह संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या पिटाऱ्यातील छुपा सितारा ‘श्रीकर भरत’ ठोठावतोय टीम इंडियाचं दार, वाचा त्याच्याबद्दल
भरतचा सॉलिड षटकार अन् जणू ट्रॉफी जिंकल्याप्रमाणे आरसीबीच्या ताफ्यात जल्लोष, पाहा तो क्षण
पलटणचा विषयचं वेगळा! आयपीएल २०२१मध्ये दिल्ली ‘टेबल टॉपर’, पण गुणतालिकेवर मुंबईचाच राहिलाय राज