आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. या स्पर्धेत विजयाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने पराभूत केले होते. या पराभवानंतर भारतीय संघातील खेळाडूंवसर जोरदार टीका देखील करण्यात आली होती. अशातच बुधवारी (३ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात भारतीय संघाने अफगानिस्तान संघावर ६६ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.
हा सामना झाल्यानंतर विराट कोहलीने म्हटले की, “ॲशचे (आर अश्विन) पुनरागमन आमच्यासाठी सकारात्मक ठरले, त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत देखील नियंत्रणात गोलंदाजी केली होती. तो एक गडी बाद करून देणारा गोलंदाज आहे, जो डोक्याचा वापर करून गोलंदाजी करतो. खरं सांगायचं झालं तर खेळपट्टी खूप चांगली होती. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात जर आमच्या फलंदाजांना मनमोकळेपणाने फलंदाजी करता आली असती तर आम्ही विरोधी संघावर दबाव बनवू शकलो असतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आमचे सुरुवातीचे ३ फलंदाज तेच राहणार आहेत. जर सलामीवीर फलंदाजांनी १४ किंवा १५ षटक गोलंदाजी केली तर ताबडतोड फलंदाजी करायची आहे की नाही, या गोष्टीचा विचार करावा लागत नाही. आपण खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण त्यांच्याकडे ते कौशल्य आहे आणि कधी कधी ते आजसारखे प्रदर्शन करतात.”
उपांत्य फेरीत प्रवेश करण्याबाबतच्या समीकरणावर बोलताना विराट कोहली म्हणाला की, “नेट रन रेटचा विचार सतत आमच्या डोक्यात सुरू होता. आम्ही संघाच्या बैठकीत याबाबत चर्चा केली आणि उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी जी संधी आम्हाला मिळेल ती आम्हाला गमवायची नाहीये. त्या गोष्टीवर आमचे लक्ष असेल आणि आम्हाला सकारात्मक व्हावे लागेल.”
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात अफगानिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माने सर्वाधिक ७४ तर केएल राहुलने ६९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर २ बाद २१० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना अफगानिस्तान संघाकडून करीम जनतने नाबाद ४२ तर मोहम्मद नबीने ३५ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
जडेजाचा जबरदस्त झेल पाहून सामना दर्शकांनी घातली तोंडात बोटे, पण अखेर प्रयत्न ठरले विफळ!
तू खिंच मेरी फोटो! चौकार मारल्यानंतर स्कॉटिश फलंदाजाची ऍक्शन पाहून बोल्टने काढला फोटो -Video
“एक,दोन, तीन…”, लाईव्ह पत्रकार परिषदेत रोहितने केले असे काही, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल