सोमवारी (८ नोव्हेंबर) आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारत आणि नामिबिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाले होते. त्यामुळे हा सामना केवळ एक औचारिकता म्हणून खेळला गेला होता. या सामन्यात भारताने नामिबिया संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. तसेच सामना झाल्यानंतर विराट कोहलीने सूर्यकुमार यादवच्या फलंदाजी बद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने घोषणा केली होती की, ही स्पर्धा झाल्यानंतर तो टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. त्यामुळे नामिबिया संघाविरुद्ध झालेला सामना हा विराट कोहलीच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील कर्णधार म्हणून शेवटचा सामना ठरला. या सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. परंतु त्याने आपले स्थान सूर्यकुमार यादवला देत, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवले होते.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने १९ चेंडूंमध्ये नाबाद २५ धावांची खेळी केली. तसेच केएल राहुलसोबत मिळून सामना देखील जिंकून दिला होता. सामना झाल्यानंतर याबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला की, “या विश्वचषक स्पर्धेत सूर्यकुमार यादवला अधिक वेळ फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. हा त्याचा पहिलाच विश्वचषक आहे. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेत काही चांगल्या आठवणी निर्माण करण्यासाठी त्याला फलंदाजी दिली गेली होती.”
भारतीय संघाचा जोरदार विजय
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नामिबिया संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डेविड विसेने सर्वाधिक २६ तर स्टीफन बार्डने २१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर नामिबिया संघाला २० षटक अखेर ८ बाद १३२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ५४ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ९ गडी राखून आपल्या नावावर केला.