सि़डनी। भारताच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्याआधी भारताचा 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत आॅस्ट्रेलिया एकादश विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सराव सामना पार पडला.
हा सामना अनिर्णीत राहिला असला तरी भारतीय फलंदाजांनी या सामन्यात चांगल्या धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजांची कामगिरी मात्र सुमार झाली. असे असले तरी भारताचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजी बरोबरच आज(1 डिसेंबर) गोलंदाजीतही कमाल दाखवली आहे.
त्याने आज आॅस्ट्रेलिया एकादश संघाच्या पहिल्या डावात एकूण 7 षटके गोलंदाजी केली. त्यातील त्याच्या 6 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने आॅस्ट्रेलिया एकादश संघाकडून शतकी खेळी करणाऱ्या हॅरि निल्सेनची विकेट घेतली.
विराटच्या गोलंदाजीवर निल्सनने मिड-आॅनला असणाऱ्या उमेश यादवकडे सोपा झेल देत विकेट गमावली. ही विकेट घेतल्यानंतर मात्र विराटला सुरुवातीला स्वत:वरच विश्वास बसेना. त्यामुळे काही क्षणानंतर त्याने त्याच्या वेगळ्या शैलीत विकेट घेतल्याचा आनंद साजरा केला.
विकेट घेतल्याचा जोरदार आनंद साजरा करताना पाहुन निल्सेननेही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.
Virat Kohli's hilarious reaction to wicket https://t.co/SCzRKso7Fg
— Bishwa Mohan Mishra (@mohanbishwa) December 1, 2018
विराटने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3 तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची जॉन्सन चार्ल्स हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची विकेट आहे. चार्ल्सला विराटने 2016 च्या टी20 विश्वचषकात विंडीज विरुद्ध बाद केले होते.
आॅस्ट्रेलिया एकादश विरुद्धच्या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 358 धावा केल्या होत्या. या डावात पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतके केली आहेत.
तर आॅस्ट्रेलिया एकादश संघाने पहिल्या डावात सर्वबाद 544 धावा केल्या आहेत. त्यांच्याकडून निल्सेनने 170 चेंडूत 100 धावा केल्या आहेत. तसेच भारताकडून सर्वाधिक विकेट्स मोहम्मद शमीने घेतल्या आहेत. त्याने 3 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने 2 तर उमेश यादव, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहलीने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी भारताकडून दुसऱ्या डावात सलामीवीर फलंदाज केएल राहुलने 62 धावांची अर्धशतकी तर मुरली विजयने 129 धावांची शतकी खेळी केली. या डावात भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 211 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–हॉकी विश्वचषक २०१८: आज पाकिस्तानसमोर तुल्यबळ जर्मनीचे आव्हान
–हॉकी विश्वचषक २०१८: ‘स्पीडी टायगर’ मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान
–आॅस्ट्रेलियात भारतीय सलामीवीरांची धमाकेदार कामगिरी