आयपीएलमध्ये सोमवारी (5 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा 59 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने केलेल्या धडाकेबाज खेळीमुळे दिल्लीला मोठी धावसंख्या गाठता आली. त्याच्या या खेळीदरम्यान त्याला जीवदानही मिळाले. स्टॉयनिसला मिळालेल्या जीवदानामुळेच आम्ही सामना गमावला असे मत आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे.
पंधराव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नवदीप सैनीने स्टॉयनिसचा झेल सोडला होता. त्यावेळी स्टोयनिस 30 धावांवर खेळत होता. त्यानंतर डावाच्या शेवटपर्यंत खेळताना त्याने 26 चेंडूंत नाबाद 53 धावा केल्या.
स्टॉयनिसने केली चांगली फलंदाजी
स्टॉयनिसबद्दल बोलताना कोहली म्हणाला, “आमच्या गोलंदाजांनी नवीन चेंडूने आक्रमकपणे गोलंदाजी केली. दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी चांगली फलंदाजी केली. सामन्याआधी वाटले होते की आम्ही गुणतालिकेतील आपले स्थान कायम राखू. फिरकी गोलंदाजांच्या साहाय्याने विकेट घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पहिल्या 6 षटकांनंतर आम्ही सामन्यात पकड बनवली होती. पण शेवटी स्टॉयनिसने चांगली फलंदाजी केली. आम्ही त्याला जीवनदान दिले, आणि त्याने आमच्याकडून सामना हिसकावून घेतला.”
संधीचा घेतला नाही फायदा
पुढे बोलताना विराट म्हणाला, “दिल्लीच्या फलंदाजांनी पहिल्या सहा षटकांत चांगली फलंदाजी केली. त्यानंतर 8 षटके आम्ही सामन्यात पकड मजबूत केली. मात्र शेवटच्या षटकांत गोलंदाजांनी खराब कामगिरी केली. संधी मिळाल्यास त्याचा उपयोग करने गरजेचे असते. मात्र आम्ही संधीचा फायदा घेतला नाही. आज आम्ही खराब कामगिरी केली.”
सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 196 धावा करत बेंगलोरला 197 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 9 बाद 137 धावाच करता आल्या. या विजयामुळे दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.