अमेरिकेत टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारतीय आणि विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसीनं (ICC) ‘ICC Awards 2023’ ची घोषणा केली आहे. यामध्ये विराट कोहलीला ‘एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर 2023’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
गेल्या काही वर्षांपासून फॉर्ममधील चढ-उतारानंतर विराट कोहलीनं 2023 मध्ये शानदार पुनरागमन केलं. तो 2023 एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. आयसीसीनं शनिवारी आपल्या इंस्टाग्रामवर 2023 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विराटला ट्रॉफी आणि कॅप सादर करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, विराट कोहलीला ‘आयसीसी एकदिवसीय प्लेयर ऑफ द इयर 2023’ पुरस्कार मिळाला असल्याचं लिहिलंय.
35 वर्षीय विराटनं 2023 मध्ये 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये 72.47 ची सरासरी आणि 99.13 च्या स्ट्राइक रेटनं एकूण 1377 धावा केल्या. त्यानं 24 डावात 6 शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 166 होती. विराटनं 2023 च्या आशिया चषकात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेतील सुपर फोर टप्प्यातील महत्त्वपूर्ण सामन्यात त्यानं पाकिस्तानविरुद्ध 94 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या होत्या.
विराट कोहलीनं एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक 765 धावा करून 2003 विश्वचषकातील सचिन तेंडुलकरचा 673 धावांचा विक्रम मोडला. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 50 वं वनडे शतक झळकावून त्यानं सचिनचा 49 शतकांचा विक्रमही मागे टाकला.
विराट कोहली त्याच्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आयसीसी टूर्नामेंटमध्ये 3 वेळा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला आहे. तो एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. तसेच तो याआधी 2014 आणि 2016 च्या आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेतही ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ राहिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
अमेरिकेतही रोहित शर्माची क्रेझी फॅन फॉलोइंग! भेट घेण्यासाठी चाहता थेट घुसला मैदानात; पाहा VIDEO
सराव सामन्यात बांगलादेशला हाणला! हार्दिक पांड्याचा अष्टपैलू खेळ, रिषभ पंतही चमकला
या नियमामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा मिळतील मोफत! टी20 विश्वचषकात लागू होण्याची शक्यता