भारतीय क्रिकेट संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काळातून जात आहे. नुकतीच त्याची तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या कर्णधार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये त्याने संघाला निर्भेळ यश मिळवून दिले. सगळीकडे रोहितची वाहवा होत असताना माजी कर्णधार विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Virat Kohli Coach Rajkumar Sharma) यांनी त्याला एक सल्ला दिला आहे. (Rajkumar Sharma Advice Rohit Sharma)
काय म्हणाले शर्मा?
भारतीय संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा हे नेहमीच भारतीय संघाबाबत आपली मते व्यक्त करत असतात. त्यांनी नुकतीच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या वर्तणूकीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. एका क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शर्मा म्हणाले,
“रोहित एक उत्कृष्ट कर्णधार आहे. मात्र, सध्या तो काहीसा रागवताना दिसत आहे. कर्णधाराने अशाप्रकारे आपल्या खेळाडूंवर रागवू नये. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही असे वागू शकत नाही. त्याने आपल्या खेळाडूंना समजवून सांगावे.”
वेस्ट इंडिजविरुद्ध दिसला रोहितचा आक्रमक अंदाज
रोहित शर्मा हा नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांत आपल्या खेळाडूंवर रागवताना दिसला होता. संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्यावर तो दोन वेळा रागावलेला दिसला. त्याला एकदा क्षेत्ररक्षण करताना तर एकदा गोलंदाजी करताना खडे बोल सुनावले होते. तसेच भुवनेश्वर कुमार याने आपल्याच गोलंदाजीवर झेल सोडल्यानंतर रोहितने रागाच्या भरात चेंडूला लाथ मारली होती. त्याच्या या कृत्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. भारतीय संघ आता २४ फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्ध तीन टी२० सामन्यांची मालिका खेळेल.
महत्वाच्या बातम्या-