दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स याने शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) मोठा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराने या दिवशी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. मे २०१८ मध्येच डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. परंतु तो इतर लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसत होता. मात्र आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर त्याचा जवळचा मित्र आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघसहकारी विराट कोहली याने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे ट्वीट करत कोहलीने लिहिले की, ‘आमच्या वेळच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि मला भेटलेल्या व्यक्तींपैकी सर्वात प्रेरणादायी असलेल्या व्यक्तीस, तू जे काही कमावले आहेस त्याचा तुझ्यासहित सर्वांना सार्थ अभिमान राहिल. तू रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी जे काही केले आहेस, ते सदैव आमच्या स्मरणात राहिल. फक्त क्रिकेटपुरतेच आपले नाते मर्यादित नव्हते आणि पुढेही ते असेच कायम राहिल.’
To the best player of our times and the most inspirational person I've met, you can be very proud of what you've done and what you've given to RCB my brother. Our bond is beyond the game and will always be.
— Virat Kohli (@imVkohli) November 19, 2021
‘तुझ्या या निर्णयामुळे मला खूप दु:ख होते आहे. परंतु मला माहिती आहे, तू घेतलेला हा निर्णय तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी योग्य असेल. आय लव्ह यू,’ असे पुढे लिहित कोहलीने तुटलेल्या हृदयाचे इमोजी टाकले आहेत.
This hurts my heart but I know you've made the best decision for yourself and your family like you've always done. 💔I love you 💔 @ABdeVilliers17
— Virat Kohli (@imVkohli) November 19, 2021
कोहलीच्या या प्रतिक्रियेला उत्तर देताना डिविलियर्सने ‘लव्ह यू टू माझ्या भावा’ असे लिहिले आहे.
Love u too my brother
— AB de Villiers (@ABdeVilliers17) November 19, 2021
महत्त्वाचे म्हणजे, डिविलियर्सच्या या निर्णयानंतर केवळ कोहलीच नव्हे तर चाहत्यांचीही मने तुटली आहेत. डिविलियर्स अखेरचा आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना दिसला होता. या हंगामात त्याने एकूण १५ सामने खेळताना ३१३ धावा चोपल्या होत्या. दरम्यान नाबाद ७६ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली होती.
डिविलियर्सच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स संघाचेही प्रतिनिधित्व केले होते. आयपीएलमध्ये त्याने १८४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३९.७१ च्या सरासरीने ५१६२ धावा फटकावल्या आहेत. त्याला आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते.
डिविलियर्सची कारकिर्द –
एबी डीविलियर्सच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५ धावा, वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ धावा, तर टी२०मध्ये ७८ सामन्यात २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटीत २ आणि वनडेत ७ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने यष्टीरक्षण करताना २१९ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर वनडेमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ ‘या’ ३ खेळाडूंना करू शकतात रिटेन
आणि एबी डिविलियर्सचे ते स्वप्न अखेर अपुर्णच राहिलं!