भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना शुक्रवारपासून (३ डिसेंबर) सुरू झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघाला लागोपाठ तीन धक्के बसल्याने संघ काहीसा बॅकफूटवर आला. या सामन्यातून पुनरागमन करणारा भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली मात्र आपली चमक दाखवू शकला नाही. तो आपले खातेही न खोलता तंबूत परतला. याच बरोबर त्याचा समावेश एका नकोशा यादीत झाला.
विराट झाला शून्यावर बाद
टी२० विश्वचषकानंतर विराट कोहली याने काही काळ विश्रांतीची मागणी केली होती. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेतून व कानपूर येथील पहिल्या कसोटीतून माघार घेतलेली. मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ उशीरा सुरू झाल्यानंतर मयंक अगरवाल व शुबमन गिल यांनी संघाला ८० धावांची सलामी दिली.
न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याने गिल व त्यानंतर पुजाराला शून्यावर बाद करत सलग दोन धक्के दिले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट याला देखील एकही धाव न करता त्याने पायचित पकडले. हा निर्णय काहीसा वादग्रस्त राहिला. त्याने चार चेंडूंचा सामना केला.
या नकोशा यादीत झाला समाविष्ट
विराट हा कसोटी कर्णधार झाल्यापासून दहाव्यांदा खाते खोलू शकला नाही. या यादीमध्ये त्याच्या पुढे केवळ न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग हा असून, तो विक्रमी १३ वेळा शून्यावर बाद झालेला. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ हा देखील दहा वेळा आपले खाते करू शकला नव्हता. इंग्लंडचे माजी कर्णधार माईक आर्थटन, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए व माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी हे प्रत्येकी आठ वेळा शून्यावर बाद झालेले.
भारताची सामन्यात वापसी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर मयंक अगरवाल आणि शुबमन गिल यांनी ८० धावांची सलामी दिली. मात्र, गिल ४४ धावांवर बाद झाल्यानंतर पुजारा व विराटदेखील याच धावसंख्येवर माघारी परतले. मात्र, एका बाजूने मयंक अगरवाल याने शानदार शतक झळकावले. श्रेयस अय्यर भारताचा बाद होणारा चौथा फलंदाज ठरला. न्यूझीलंडसाठी सर्व बळी फिरकीपटू एजाज पटेलने मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-