कानपुर । येथील ग्रीन प्रक मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील निर्णायक सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा बरोबरच विराट कोहलीनेही कारकिर्दीतील ३२ वे शतक पूर्ण केले आहे.
या दोघांनी मिळवून भारताचे धावफलक २५० पुढे नेले. या दोघांनी २३० धावांची भागीदारी केली.
पहिल्या वनडे सामन्यात शतक केल्यानंतर विराट कोहलीला पुण्यातील वनडे सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण या सामन्यात विराट कोहलीने आपले शतक ९८ चेंडूत पूर्ण केले.
या शतकी खेळीमध्ये त्याने ८ चौकर आणि २ षटकार खेचले आहेत. विराट कोहलीने हे शतक १०४ च्या स्ट्राइक रेटने केले आहे. असे करताना विराटने आंतराष्ट्रीय वनडे सामन्यातील ९००० धावा ही पूर्ण केल्या आहेत.
भारत आता २८३ धावांवर ३ बाद अश्या सुस्थितीत आहे. विराट कोहली १०० धावांवर खेळात आहे तर रोहित शर्मा १४७ धावांवर बाद झाला आहे, त्यात त्याने १८ चौकार आणि २ षटकार खेचले.
शतकानंतर रोहितने जोरदार फलंदाजी चालू केली होती. आता विराटही तसेच काहीसे करेल आणि भारताला मोठ्या धावसंख्ये पर्यंत नेईल असे दिसून येते. विराट सोबत सध्या भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी खेळत आहे. या रीतीने फलंदाजी होत राहिली तर भारत ३०० धावांपेक्षा अधिक धावसंख्या उभारू शकतो.