इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना बुधवारपासून (२५ ऑगस्ट) हेडिंग्ले येथील लीड्स मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघ दुसरी कसोटी जिंकून आघाडीवर असला तरी, हीच विजयी लय कायम राखण्याचा विराट आणि कंपनीचा प्रयत्न असेल. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने या तिसऱ्या सामन्याविषयी अनेक महत्त्वपूर्ण विधाने केली.
खेळपट्टीबाबत मांडले मत
सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार आभासी पत्रकार परिषदेद्वारे पत्रकारांना सामोरा गेला. त्याने या पत्रकार परिषदेत खेळपट्टीविषयी आश्चर्य व्यक्त केले. विराट म्हणाला,
“आम्हाला वाटलेले की, लीड्सवरील खेळपट्टी हिरवीगार असेल. मात्र, तसे काही झाले नाही. आम्ही आमचा बारा जणांचा संघ निवडला असून, त्यातून अंतिम अकरा जणांची निवड केली जाईल.”
अश्विनला बसावे लागू शकते बाकावर
भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत बोलताना तो म्हणाला,
“अश्विन खेळणार की नाही याबाबत निर्णय सामन्याच्या आधी होईल.”
विराटने बोलता-बोलता अप्रत्यक्षरीत्या अश्विन या सामन्यात खेळणार नसल्याचे संकेत दिले. विराट म्हणाला,
“आम्हाला संघात बदल करायचे काही कारण वाटत नाही. सर्व खेळाडूंनी दोन्ही सामन्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.”
भारत तिसऱ्या सामन्यातही चार वेगवान गोलंदाज व फिरकी गोलंदाज म्हणून अष्टपैलू रवींद्र जडेजासह मैदानात उतरू शकतो.
सलामीवीर व सिराजचे केले कौतुक
विराटने या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा व केएल राहुल यांचे विशेष कौतुक केले. तसेच, लॉर्ड्स कसोटीत आपल्या वेगवान गोलंदाजीने इंग्लंडचे आठ बळी मिळवणाऱ्या मोहम्मद सिराजचे त्याने विशेष गुणगान गायले.
तिसऱ्या कसोटीसाठी संभावित भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व इशांत शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
“कारकिर्दीत मला असे कधीच जाणवले नव्हते”, बुमराहच्या बाउंसरबाबत अँडरसनने सोडले मौन