दिग्गज भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला चांगलंच फटकारलं आहे. करणचा क्लास घेताना सेहवाग म्हणाला की, त्याचा काहीही उपयोग नाही. तो पूर्ण फलंदाजीही करत नाही किंवा गोलंदाजीही करत नाही.
गुजरातविरुद्धच्या सामन्यात पंजाबला तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संघ 142 धावांवर ऑलआऊट झाला. त्यानंतर गुजरातनं पाच चेंडू बाकी असताना लक्ष्य यशस्वीरित्या गाठलं.
पंजाबकडून सॅम करन सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. त्यानं 19 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीनं 20 धावांची खेळी खेळली. तर गोलंदाजीत करननं दोन षटकं टाकली आणि एक विकेट घेतली. नियमित कर्णधार शिखर धवनच्या दुखापतीमुळे करण गेल्या काही सामन्यांत पंजाबचं नेतृत्व करत आहे. संघानं या 25 वर्षीय इंग्लिश अष्टपैलू खेळाडूला आयपीएल 2023 च्या आधी तब्बल 18.5 कोटी रुपयांना विकत घेतले होतं. फ्रँचायझीने त्याला या हंगामासाठी कायम ठेवलंय.
‘क्रिकबझ’वरील चर्चेदरम्यान सेहवाग म्हणाला, “जर मी असतो तर मी सॅम करनचा संघात समावेश केला नसता. तो ना बॅटिंग ऑलराउंडर आहे ना बॉलिंग ऑलराउंडर. थोडी फलंदाजी आणि थोडी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूला काही उपयोग नाही. एकतर पूर्णपणे फलंदाजी करून सामना जिंकवा, किंवा पूर्णपणे गोलंदाजी करून सामना जिंकवा.”
गुजरात विरुद्धच्या पराभवानंतर सॅम करन म्हणाला की, पंजाबनं 10-15 धावा कमी केल्या, जे निर्णायक ठरलं. तो म्हणाला, “मला वाटतं की आम्ही 10-15 धावा कमी राहिलो. आम्ही गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. संघानं दाखवलेली बांधिलकी आणि लढा अप्रतिम होता. मात्र, हे पुरेसे नव्हतं. त्यांच्या संघात काही जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत, आणि साई किशोरनं खरोखरच शानदार गोलंदाजी केली. याचं श्रेय त्याला जातं. आम्हाला 160 च्या वर धावा करायला हव्या होत्या, मात्र तरीही आम्ही कडवी झुंज दिली.”
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल तेवतिया पुन्हा एकदा ठरला हिरो! गुजरातचा पंजाबवर 3 गडी राखून विजय, गुणतालिकेत घेतली मोठी झेप
“कृपया हा नियम काढून टाका”, आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’बाबत मोहम्मद सिराजचं मोठं विधान