भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग त्याच्या वादळी आणि आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. त्याची धडाकेबाज फलंदाजी प्रतिस्पर्धी संघांसाठी वाईट स्वप्नाप्रमाणे असायची. त्याने त्याच्या अशाच फलंदाजी शैलीने अनेक विविध विक्रमही रचले.
कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडूदेखील ठरला होता. पण याबद्दलची भविष्यवाणी त्याने हा विक्रम रचण्याआधीच केली होती. याची आठवण भारताचा माजी फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मणने त्याच्या त्याच्या ‘281 अँड बियॉन्ड’ या आत्मचरित्रात मांडली आहे.
लक्ष्मणने 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोलकता कसोटीत 452 चेंडूत 281 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तसेच राहुल द्रविड बरोबर 376 धावांची भागिदारीही रचली होती. लक्ष्मणचे त्रिशतक त्यावेळी थोडक्यात हुकले होते. त्याला ग्लेन मॅकग्राथने बाद केले होते. पण लक्ष्मण-द्रविडच्या त्या भागीदारीमुळे भारताने तो सामना फॉलोऑन मिळाल्यानंतरही जिंकला होता.
त्यानंतर काही दिवसांनी पुण्यात होणाऱ्या वनडे सामन्याआधी सेहवागने लक्ष्मणला म्हटले होते एकदिवस मी कसोटीत त्रिशतक करणारा भारताचा पहिला फलंदाज बनेल.
याबद्दलची आठवण सांगताना लक्ष्मणने म्हटले आहे की “पुण्यातील सामन्याआधी रात्री सेहवाग, झहिर आणि मी आम्ही जेवायला गेलो होतो. त्यावेळी सेहवाग म्हणाला, लक्ष्मण भाई, तूला कोलकता कसोटीत त्रिशतक करण्याची चांगली संधी होती. पण दुर्दैवाने तू ती केले नाही. आता तू बघच मी कसोटी क्रिकिटमध्ये त्रिशतक करणारा भारताचा पहिला फलंदाज बनेल.”
“त्यावेळी मी(लक्ष्मण) त्याच्याकडे (सेहवाग) आश्चर्याने पाहिले. हा मुलगा फक्त चार वनडे खेळला आहे. कसोटी निवडीसाठी अजून तो आसपासही नाही आणि तरीही तो अशी भविष्यवाणी करत होता. काही सेंकदासाठी मला वाटलं तो मस्करी करत असावा, पण तो खरंच बोलत होता.”
सेहवागने तीन वर्षांनंतर पाकिस्तान विरुद्ध मुलतान येथे 29 मार्च 2004 रोजी त्रिशतक करत ती भविष्यावाणी खरी केली आणि त्याखेळीनंतर सेहवागने लक्ष्मणला भविष्यवाणी खरी झाल्याची आठवणही करुन दिली. सेहवागने त्यावेळी 375 चेंडूत 39 चौकार आणि 6 षटकार ठोकत 309 धावांची खेळी केली होती.
कसोटीतील पहिले त्रिशक केल्यानंतर बरोबर ४ वर्षांनी सेहवागने कसोटीतील दुसरे त्रिशतक केले. साल 2008 ला 28 मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सेहवागने कसोटीत 319 धावांची त्रिशतकी खेळी करत कसोटीत दोन त्रिशतके करणारा पहिला भारतीय ठरण्याचाही मान मिळवला.
वाचा –
मार्च महिन्यातील ‘ते’ दोन दिवस, जेव्हा सेहवागने प्रतिस्पर्धी संघांना दिवसा तारे दाखवले होते…
IPL 2022 | एक ‘गावकरी’ आणि एक ‘नावकरी’, दोघांनी मिळून KL राहुलच्या स्वप्नांना लावला सुरुंग
गुजरात टायटन्सच्या ऐतिहासिक विजयाचे तीन हिरो; कामगिरी अशी की, लखनऊ संघानेही टेकले गुडघे