fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

२९ मार्च रोजी सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये केले होते दोन त्रिशतक

अनेक भारतीय फलंदाजांनी कसोटीमध्ये मोठे विक्रम केले आहेत. पण असा एक विक्रम आहे जो केवळ धडाकेबाज सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागला करता आलेला आहे. तो विक्रम म्हणजे कसोटीमध्ये २ वेळा त्रिशतक. २८ आणि २९ मार्च ही तारिख सेहवागसाठी खास आहे. कारण सेहवागने कसोटीमध्ये २८ मार्च आणि २९ मार्चला त्रिशतके केली आहेत.

त्याने पहिले त्रिशतक २९ मार्च २००४ ला पाकिस्तानविरुद्ध मुल्तानमध्ये केले होते. त्यानंतर त्याने ४ वर्षांनी २८ मार्च २००८ ला चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरे त्रिशतक केले होते. पण २८ मार्चला त्रिशतक केल्यानंतर तो २९ मार्चला बाद झाला होता.

पहिले त्रिशतक – 

२००४ च्या पाकिस्तान दौऱ्यात २८ मार्चपासून मुल्तान येथे सुरु झालेल्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सेहवागसह आकाश चोप्रा सलामीला फलंदाजीला उतरला. पण आकाश चोप्रा ४२ धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ राहुल द्रविडही ६ धावांवर बाद झाला.

पण नंतर सेहवागला सचिन तेंडुलकरने चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाखेर हे दोघेही नाबाद होते. सेहवाग नाबाद २२८ धावांवर आणि सचिन नाबाद ६० धावांवर खेळत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही सेहवाग आणि सचिनने चांगला खेळ केला.

त्यादिवशी सेहवागने शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या सक्लेन मुश्ताकच्या चेंडूवर षटकार मारत त्याचे पहिले कसोटी त्रिशतक अवघ्या ३६४ चेंडूत साजरे केले. त्याने त्या सामन्यात ३७५ चेंडूत ३०९ धावा केल्या. या खेळीत त्याने ३४ चौकार आणि ६ षटकार मारले.

तसेच त्याच डावात सचिनने १९४ धावांची खेळी केली होती. या दोघांच्या खेळीमुळे हा सामना भारत पुढे १ डाव आणि ५२ धावांनी जिंकला होता.

दुसरे त्रिशतक – 

कसोटीतील पहिले त्रिशक केल्यानंतर बरोबर ४ वर्षांनी सेहवागने कसोटीतील दुसरे त्रिशतक केले. २००८ ला २६ मार्चपासून चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना सुरु झाला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली. त्यांचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी ५४० धावांवर संपला.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या सेहवागने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाखेर तो ५२ धावांवर नाबाद होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी(२८ मार्च) त्याने २७८ चेंडूत त्याचे कसोटीतील दुसरे त्रिशतक पूर्ण केले. त्यावेळी तो कसोटीमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणारा फलंदाज ठरला होता. आजही हा विक्रम त्याच्या नावावर आहे.

तिसऱ्या दिवशी तो ३०९ धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर चौथ्या दिवशी(२९ मार्च) तो ३०४ चेंडूत ३१९ धावा केल्यानंतर बाद झाला. त्याने या खेळीत ४२ चौकार आणि ५ षटकार मारले होते. त्याचबरोबर या डावात द्रविडनेही १११ धावांची शतकी खेळी केली होती. पुढे हा सामना अनिर्णित राहिला.

ट्रेडिंग घडामोडी – 

कमी कसोटी सामने खेळूनही २००० पासून १४ कर्णधार पाहिलेले दोन संघ

आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेणारे ३ क्रिकेटर्स

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट

हर्षा भोगले असे काय बोलले, ज्यामुळे धोनीचे चाहते झाले नाराज

विश्वचषकात आजपर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केलेले ७ कर्णधार व त्यांची कामगिरी

You might also like