भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग सोशल मिडीयावर देखील धुवांधार टोलेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचे ट्विट्स कायमच चर्चेत असतात. नुकतेच त्याने हनुमा विहारीबद्दल केलेले ट्विटही असेच चर्चेत आले आहे. ‘अपना विहारी सब पर भारी’, असे कॅप्शन देत त्याने हे ट्विट केले आहे.
त्याचे झाले असे की, सिडनी कसोटीत हनुमा विहारीने झुंजार खेळी करून भारताला सामना अनिर्णीत राखण्यात मदत केली. यात विशेषतः त्याने दुखापत झाली असतानाही दिलेली झुंज पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले होते. मात्र भाजप नेते बाबुल सुप्रियो हे विहारीच्या खेळीवर नाराज असल्याचे दिसून आले. सामन्यानंतर त्यांनी “विहारीने क्रिकेटची हत्या केली”, असे शक्कादायक ट्विट केले. त्यांचा रोख विहारीने संथपणे केलेल्या फलंदाजीवर होता.
त्यांच्या या ट्विटनंतर हनुमा विहारी त्यांना तिखट भाषेत प्रत्युतर देईल अशी अपेक्षा होती, मात्र त्याने बाबुल सुप्रियो यांच्या ट्विटमधील केवळ व्याकरणाची चूक दुरुस्त करत त्याने त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले. सुप्रियो यांनी बिहारी असे लिहिले होते, मात्र ते विहारी असल्याचे हनुमाने लक्षात आणून दिले.
*Hanuma Vihari
— Hanuma vihari (@Hanumavihari) January 13, 2021
हनुमाच्या या कृतीवर खुश झालेल्या सेहवागने या ट्विटचा फोटो शेअर करत ‘अपना विहारी सब पर भारी’, असे ट्विट केले. त्याचे हे ट्विट देखील आता व्हायरल होत आहे.
Apna Vihari , Sab par Bhaari ! pic.twitter.com/PoHqWHUIwV
— Virender Sehwag (@virendersehwag) January 13, 2021






