भारताचा १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने शुक्रवारी (६ फेब्रुवारी) भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला १०० धावांनी पराभूत केले. या विजयाबरोबरच भारताने सहाव्यांदा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. संघाच्या या विजयात स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशीची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने विरोधी संघाला सळो की पळो करून सोडले.
या सामन्यात वैभवने १५ चौकार आणि १५ षटकार मारले. त्याने ८० चेंडूत १७५ धावा केल्या. ही या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्याने केवळ ५५ चेंडूतच शतक पूर्ण केले. त्यामुळे तो १९ वर्षाखालील विश्वचषकात सर्वात जलद शतक पूर्ण करणारा दुसरा खेळाडूही ठरला.
सामन्यानंतर वैभवने त्याच्या मनात फलंदाजी करताना काय चालले होते आणि कोणाच्या सल्ल्याने शेवटच्या सामन्यात मोठी खेळी केली, याचा उलगडा केला आहे. आयसीसीने शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये वैभव म्हणाला, “मी कालच लक्ष्मण सरांशी बोललो. त्यांनी मला तू १०० मागे नको धावू, तू फक्त आपला खेळ नैसर्गिकरित्या खेळ आणि शंभर धावा बरोबर होतील.”
ही स्पर्धा सुरू होण्याआधी वैभवने त्याच्या धमाकेदार फलंदाजीने चाहत्यांना आकर्षित केले होते. मात्र स्पर्धेत शेवटच्या सामन्याआधी त्याने एकही शतकी खेळी केली नाही आणि तो अनेकदा बाऊंसरवर बादही झाला होता. अखेर अंतिम सामन्यात त्याने शतकी खेळी केली. यामुळे त्याने याचे श्रेय बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसचे मुख्य व्ही व्ही एस लक्ष्मण यांना दिले आहे.
लक्ष्मणनेच वैभवला शांत राहून फलंदाजी कर आणि वैयक्तिक खेळीपेक्षा स्वत:वर विश्वास ठेवत खेळ. त्यांच्या या मोलाच्या सल्ल्याने वैभव आत्मविश्वासाने खेळला. तो या सामन्याचा सामनावीर तसेच प्लेयर ऑफ द टुर्नामेंटही ठरला. त्याच्या या दीडशतकी खेळीने भारताने ४११ धावसंख्येचा डोंगर उभा केला होता.
या स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना भारत अपराजित राहिला. भारताने उपांत्या फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ३११ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग केला आणि धडाक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला होता.






