मागच्या काही दिवसांपासून भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण सतत चर्चेचा विषय ठरले आहेत. राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुखपद स्वीकारणार असल्याचे सांगितले जात आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी याबाबतीत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शहांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मण याना ही जबाबदारी स्विकारण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
टी२० विश्वचषकानंतर रवी शास्त्रींचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळ संपला आणि त्यांनी संघाची साथ सोडली. त्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी राहुल द्रविड एनसीएचे प्रमुख होते. त्यांनी त्यांची जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडली होती. द्रविड यांनी एनसीए प्रमुखपद सोडल्यानंतर लक्ष्मण या पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. मात्र, यासाठी त्यांना बीसीसीआयने सांगितलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत बोलताता बीसीसीआय सचिव जय शहांनी लक्ष्मणच्या एनसीए प्रमुखपदी नियुक्तीविषयी मोठी माहिती दिली. जय शहा म्हणाले की, “आम्ही एनसीएच्या नियुक्तीसाठी जाहिरात देऊ. आधी त्यांना (लक्ष्मण) या पदासाठी स्वतःचा अर्ज द्यावा लागेल.”
तत्पूर्वी, राहुल द्रविड यांनादेखील भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारण्यापूर्वी नियुक्तीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागली होती. बीसीसीआयने आधी मुख्य प्रशिक्षक पदासाठी जाहीरात प्रदर्शित केली होती. त्यानंतर द्रविड यांना या पदासाठी अर्ज करायला सांगितले गेले आणि नंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली. लक्ष्मण यांनादेखील या संपूर्ण प्रकियेतून जावे लागणार आहे.
लक्ष्मण यांना एनसीएचे प्रमुख पद स्वीकारण्यासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. ते अगोदर आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादच्या संचालकाची जबाबदारी पार पाडत होते. त्यांनी आता या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, त्यांना एनसीएची ही नवीन जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी कोणत्याही वृत्तपत्रासाठी कॉलम लिहिणे, तसेच समालोचन करणे सोडावे लागणार आहे.