---Advertisement---

मराठी माणसाला अभिमान वाटेल असा आहे वानखेडे स्टेडियम बनण्याचा इतिहास

On: मंगळवार, मे 17, 2022 1:00 PM
wankhede-stadium
---Advertisement---

मनोरंजन या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा सिझन सुरू आहे. कोरोनाची भीती अजूनही पूर्णपणे कमी झाली नसल्याने साखळी सामने महाराष्ट्रात होतायेत. आयपीएलच्या या सिझनचे यजमानपद मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम, वानखेडे स्टेडियम, डी वाय पाटील स्टेडियम आणि पुण्याचे एमसीए स्टेडियम भूषवतेय. या चारपैकी वानखेडे स्टेडियम कसं बनलं. याचा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला माहित असायलाच हवा, असाच आहे.

तर मुंबई म्हणजे इंडियन क्रिकेटच माहेरघर. देशातील क्रिकेट इथंच सुरू झालं. बॉम्बे जिमखान्यात भारतीय क्रिकेटचा पाळणा हलला. आपल्याकडेही एक दर्जेदार स्टेडियम असावा म्हणून गवर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या नावाने १९३७ ला सीसीआयने ब्रेबॉर्न स्टेडियमची उभारणी केली. तेव्हाच्या बॉम्बेतील सार क्रिकेट इथेच होऊ लागलं. ३५ वर्ष बॉम्बे क्रिकेट म्हणजेच ब्रेबॉर्न असंच समीकरण होऊन बसलेलं.

त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा संघर्षपूर्ण लढा लढून १ मे १९६० ला मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य तयार झाले. यशवंतरावजी चव्हाण मुख्यमंत्री बनले. त्यांच्या याच मंत्रीमंडळात अर्थमंत्री बनले बॅरिस्टर शेषराव वानखेडे. विदर्भातून आलेल्या वानखेडे यांचा मुंबईत शब्द चालत होता. वानखेडे हे दर्दी क्रिकेटप्रेमी. १९६३ ला ते बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे सर्वसर्वो बनले.

अनेक रिपोर्ट्सच्या नुसार वानखेडे स्टेडियमची कहाणा अशी सांगितली जाते की, १९७३ मध्ये शेषराव वानखेडे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनलेले. सभागृहातील रोजच्या तणातणीने कंटाळलेले काही आमदार वानखेडेंकडे गेले. त्यांनी एखादी चॅरिटी मॅच खेळायची का?. असा सवाल वानखेडेंना केला. आता क्रिकेट हे नाव ऐकून वानखेडे ना म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

त्या वेळी मुंबईतील एकमात्र क्रिकेट स्टेडियम होते ब्रेबॉर्न स्टेडियम. वानखेडे बीसीएचे अध्यक्ष राहिले असले तरी, हे स्टेडियम होते सीसीआयच्या मालकीचे. ती चॅरिटी मॅच ब्रेबॉर्नवर होणार ते साऱ्यांनी गृहीतच धरले. आता आमदार आणि विधानसभा अध्यक्षांना नाही कोण म्हणणार. तरीही एकदा सीसीआयवाल्यांना कल्पना देऊ म्हणून वानखेडेंसह काही आमदार त्यावेळी सीसीआय अध्यक्ष असलेल्या विजय मर्चंट यांच्याकडे गेले.

विजय मर्चंट म्हणजे भारताचे ब्रॅडमन. घरी आलेल्या आमदारांचे मर्चंट यांनी चांगले आदरातिथ्य केले. शेवटी वानखेडे यांनी चॅरिटी मॅचचा विषय काढला आणि मर्चंट यांचा मूडच बदलला. त्यांनी स्पष्ट शब्दात मैदान देण्यास नकार दिला. सारे अवाक् झाले. वानखेडे आणि मर्चंट यांच्यात वादाची ठिणगी पडली. वानखेडे म्हणाले, तुम्ही मनमानी सुरू केली, तर आम्हाला नवीन स्टेडियम बांधायला लागेल. त्यावर मर्चंट यांचे उत्तर कोणालाही राग येईल असे होते. मर्चंट सरळ म्हणाले, तुम घाटी लोग क्या स्टेडीयम बनाओगे?

असे म्हणले जाते की, या वाक्याने सारे आमदार संतापले आणि तिथून निघून गेले. बाकीच्यांचा राग निवळला असेल. पण, वानखेडेंचा ईगो हर्ट झालेला. वानखेडे पोहोचले त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईक यांच्याकडे. त्यांनी सुरुवातच नकाराने केली. मात्र, त्यांनी मर्चंट यांनी केलेला मराठी माणसाचा अपमान मुख्यमंत्र्यांना सांगितला. पण स्टेडियम बांधायचा खर्च उचललायला मुख्यमंत्री तयारच नव्हते. त्यावेळी वानखेडे यांनी फक्त जागा द्या, पैसे आम्ही लावतो अशी ऑफर दिली.

मुंबईतील पॉश एरियात आणखी एक स्टेडियम म्हणून अनेकांनी विरोध केला. शेवटी अनेक अडथळे पार करून ब्रेबॉर्नपासून जवळच असलेली १३ एकर जागा वानखेडे यांच्याकडे सुपूर्द केली गेली. स्टेडियम बांधण्यासाठी आर्किटेक म्हणून जबाबदारीही मराठी माणसाच्याच खांद्यावर टाकली. ते आर्किटेक होते केवळ २८ वर्षांचे शशी प्रभू. त्यांनी जगभरातील अनेक बड्या स्टेडियमचा अभ्यास केला आणि स्टेडियमच्या कामाचे भूमिपूजन झाले. दिवस-रात्र एक करून फक्त ११ महिने आणि २३ दिवसात स्टेडियम उभे राहिले. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या मर्चंट यांना दिलेला शब्द वानखेडेंनी पूर्ण केला. तोही ब्रेबॉर्नपेक्षा भव्य स्टेडियम बांधून. ज्या शेषराव वानखेडेंनी हे स्टेडियम बांधण्याचा विडा उचललेला. त्याच वानखेडे यांचे नाव स्टेडियमला देण्यात आले.

१९७४ ला वानखेडे स्टेडियम सुरू झाले आणि सीसीआयची किंमत कमी झाली. १९७३ नंतर ब्रेबॉर्नला आपली पुढची कसोटी आयोजित करायला ३६ वर्ष वाट पहावी लागली. आजही भारतातील सर्वात शानदार क्रिकेट स्टेडियम म्हणून पहिले नाव घेण्यात येते ते वानखेडे स्टेडियमचे.

याच वानखेडे स्टेडियमवर पुढे भारतीय क्रिकेटमधील अनेक सुवर्णपाने लिहिली गेली. रवी शास्त्रींनी एकाच षटकामध्ये सहा षटकार मारण्याचा कारनामा करून दाखवला. आपण मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला शेवटच्या वेळी याच स्टेडियमवर खेळताना पाहिले आणि त्याच सचिनला आणि सार्‍या भारतीयांना २८ वर्षानंतर विश्वचषकाची भेट देणाऱ्या धोनीच्या षटकारालाही.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वाचा – 

मोठी बातमी! भारताची सुवर्ण इतिहासाला गवसणी, ७३ वर्षांत पहिल्यांदाच जिंकला ‘थॉमस कप’

खेळाडू मैदानावर बॉल पँटवर का घासतात? जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---