ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारपासून (26 डिसेंबर) कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे सुरु होणार आहे. मात्र या सामन्याआधी दोन्ही संघांना खेळाडूंच्या दुखापतीची चिंता सतावत आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर दुसऱ्या कसोटी सामन्याला देखील मुकणार आहे.
वॉर्नरला भारताविरुद्ध वनडे मालिका खेळताना मांडीची दुखापत झाली होती. त्यामुळे तो भारताविरुद्ध टी२० मालिका आणि कसोटी मालिकेतील पहिला सामना देखील खेळला नव्हता.
वॉर्नर व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज सीन ऍबॉट देखील दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या पोटरीला दुखापत झाली होती. ऍबॉट जरी सध्या दुखापतीतून फिट झाला असला तरीही त्याला आणि वॉर्नरला ऑस्ट्रेलियाच्या जैवसुरक्षेच्या नियमांमुळे दुसरा कसोटी सामना खेळता येणार नाही.
वॉर्नर आणि ऍबॉट शनिवारीच सिडनीतून मेलबर्नसाठी रवाना झाले आहेत. त्याआधी ते सिडनीत त्यांच्या घरी होते. पण सिडनीत कोरोना व्हायरसचा पुन्हा उद्रेक झाला आहे. असे असले तरी ते दोघेही न्यू साऊथ वेल्सने घोषित केलेल्या कोविड हॉटस्पॉटमध्ये नव्हते. पण तरीही त्यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या जैवसुरक्षेच्या नियमांमुळे दुसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियन संघात सहभागी होता येणार नाही.
हे दोघेही ७ जानेवारी २०२१ पासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघाशी जोडले जातील.
वॉर्नर दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नाही म्हणजेच ऑस्ट्रेलिया अंतिम ११ जणांच्या संघात बदल करण्याची शक्यताही कमी झाली आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोव्हस्की देखील दुखापतग्रस्त आहे. त्याला भारताविरुद्ध सराव सामना खेळताना डोक्याला चेंडू लागला होता. त्यामुळे तो आधीच दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून जो बर्न्स आणि मॅथ्यू वेडलाच सलामी जोडी म्हणून दुसऱ्या कसोटीत खेळावे लागणार आहे.
स्मिथच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह –
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथला देखील पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. स्मिथने मेलबर्नला होणाऱ्या दुसऱ्या कसोटीआधी फिट होण्याची आशा व्यक्त केली आहे.
मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर –
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. ही दुखापत त्याला ऍडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळताना झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर पडला असून लवकरच तो भारतात परतेल.
महत्त्वाच्या बातम्या –
स्टिव्ह स्मिथला पुन्हा कर्णधार करणार का? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले ‘हे’ उत्तर
‘या’ दिग्गज खेळाडूशिवाय पाकिस्तान खेळणार न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामना