कोलकता। आज(24 मार्च) आयपीएलच्या 12 मोसमातील दुसरा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना कोलकता नाईट रायडर्स समोर विजयासाठी 20 षटकात 181 धावांचे आव्हान ठेवले आहे.
हैद्राबादकडून माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 53 चेंडूत 85 धावांची तुफानी खेळी केली आहे. त्याने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले. हे वॉर्नरचे आयपीएलमधील 37 वे अर्धशतक होते.
त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने गौतम गंभीरच्या 36 अर्धशतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
त्याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीतही वॉर्नर अव्वल स्थानी आहे. त्याने 40 वेळा 50 किंवा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराटने 38 वेळा 50 किंवा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
वॉर्नरने या विक्रमांबरोबरच आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध 700 धावांचा टप्पा पार करण्याचाही पराक्रम केला आहे. कोलकता विरुद्ध हा टप्पा पार करणारा तो एकूण तिसराच तर पहिला परदेशी फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा आणि सुरेश रैनाने हा पराक्रम केला आहे.
वॉर्नरला आयपीएलच्या मागील मोसमाला मुकावे लागले होते. मागीलवर्षी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथवर एक वर्षाची बंदी घातली होती. त्यामुळे बीसीसीआयनेही वॉर्नर आणि स्मिथला मागील मोसमात आयपीएल खेळण्यास नकार दिला होता.
पण आज वॉर्नरने अर्धशतक करत आयपीएलमध्ये एक वर्षानंतर दमदार पुनरागमन केले आहे.
-आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे क्रिकेटपटू:
37 – डेव्हिड वॉर्नर
36 – गौतम गंभीर
35 – सुरेश रैना
34 – विराट कोहली, रोहित शर्मा
32 – शिखर धवन
-कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
762 – डेव्हिड वॉर्नर
757 – रोहित शर्ना
746 – सुरेश रैना
महत्त्वाच्या बातम्या-
–या संघाचे आयपीएलमध्ये झाले आहेत सर्वाधिक कर्णधार
–सनरायझर्स हैद्राबादचे आज नेतृत्व करणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा अनोखा विक्रम…






