चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळलेला डेव्हिड वॉर्नर अखेर माध्यमांसमोर आला आहे. तो जेव्हा सिडनीच्या विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याला पत्रकारांनी घेरले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना वॉर्नर म्हणाला, “तुम्हाला समजू शकते की हे खूप अवघड आहे. ही वेळ माझ्या पत्नीसाठी आणि मुलींसाठी खूप भावनिक आहे.”
तसेच काही वेळेपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन राजीनामा देणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. याविषयी वॉर्नरला प्रश्न विचारण्यात आल्यावर तो म्हणाला, “मी यावर काही दिवसांनंतर बोलेल. आत्ताच्या क्षणाला तरी माझ्या मुलींना झोपवणे आणि थोडी विश्रांती घेऊन माझे मन थोडेसे मोकळे होणे याला माझे प्राधान्य आहे. त्यामुळे मी यावर काही दिवसांनी विचार करेल आणि बोलेल.”
वॉर्नर याआधीच ट्विट करून या प्रकरणावर प्रथमच भाष्य केले होते. त्याने यात क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली होती. “सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रेमी आणि जगातील चाहत्यांनो मी पुन्हा सिडनीला येत आहे. ज्या चुका झाल्या त्यामुळे क्रिकेटचे नुकसान झाले. मी सर्वांची माफी मागतो आणि याची सर्व जबाबदारी घेतो.
या चुकांमूळे क्रिकेट प्रेमींना झालेले दु:ख मी समजतो. ज्या खेळावर मी बालपणापासून प्रेम केले त्यावर हा एक डाग लागला आहे. मला आता थोडी शांततेची गरज असून परीवाराबरोबर वेळ घालवायचा आहे. तसेच मला विश्वासू सल्लागाराचीही मदत घ्यावी लागणार आहे. तुम्हाला लवकरच माझ्याकडून काहीतरी चांगलं कळेल. ” असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
— David Warner (@davidwarner31) March 29, 2018
चेंडू छेडछाड प्रकरणात वॉर्नर हाच मुख्य सूत्रधार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या चौकशी नंतर समोर आले आहे. चेंडू छेडछाड प्रकरणाची सर्व योजना वॉर्नरची होती. ज्याला स्टीव्ह स्मिथने पाठिंबा दिला होता. यामुळे वॉर्नर आणि स्मिथवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १ वर्षांची बंदीची कारवाई केली आहे.