भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने १-० ने मालिकेत आघाडी घेतली आहे. गोलंदाजांच्या दिमाखदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने हा एकतर्फी विजय मिळवला होता. गोलंदाजांनी उत्तम कामगिरी बजावली असली, तरीही फलंदाज आपल्या लौकिकास साजेसा खेळ करू शकले नव्हते. खासकरून अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नरची उणीव ऑस्ट्रेलियाला नक्कीच भासली. त्याचवेळी, वॉर्नर दुसऱ्या सामन्यासाठी देखील उपलब्ध असणार नाही, अशी बातमी आली आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, वॉर्नर मालिकेतील तिसऱ्या कसोटीला देखील मुकू शकतो, असे म्हटले जात आहे.
वनडे मालिकेत जखमी झाला होता वॉर्नर
भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात वॉर्नर क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो टी२० मालिकेतून बाहेर पडला. वॉर्नर कसोटी मालिकेतून पुनरागमन करेल, असे वाटत असताना पहिल्या दिवस-रात्र कसोटीसाठी तंदुरुस्त झाला नाही. बुधवारी (२३ डिसेंबर) स्पष्ट करण्यात आले की, वॉर्नर ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी देखील उपलब्ध नसेल.
तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडू शकतो वॉर्नर
सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतून वॉर्नर बाहेर पडू शकतो, असे एका क्रीडा संकेतस्थळाने सांगितले आहे. त्यांच्या वृत्तानुसार, ‘वॉर्नर सिडनी येथे राहून तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, त्याचवेळी सिडनी येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे, व्हिक्टोरिया राज्यात सिडनी येथून येणाऱ्या लोकांना प्रवेश देणे बंद केले जाऊ शकते. वॉर्नर व वेगवान गोलंदाज सीन ऍबॉट हे यापूर्वीच मेलबर्नकडे येण्यास निघाले आहेत. त्यांना तेथे क्वारंटाईन केले गेले, तर ते तिसऱ्या सामन्यातही भाग घेऊ शकणार नाहीत.’
ऑस्ट्रेलियाला सतावते सलामीची समस्या
डेविड वॉर्नर सलामीला उतरला नाही, तर ऑस्ट्रेलियासाठी मोठी समस्या उभी राहू शकते. वॉर्नरच्या अनुपस्थितीत युवा फलंदाज विल पुकोवस्की ऑस्ट्रेलियासाठी सलामीला खेळणार होता. मात्र, सराव सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीचा चेंडू पुकोवस्कीच्या हेल्मेटवर लागल्याने तो पहिल्या कसोटीतून बाहेर झाला होता. त्याच्या जागी मॅथ्यू वेडने सलामी दिली होती. दुसरा सलामीवीर जो बर्न्सने दुसऱ्या डावात अर्धशतके झळकावत संघ व्यवस्थापनाला आत्मविश्वास दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी भारतीय दिग्गजाने निवडला भारत- ऑस्ट्रेलियाचा संयुक्त कसोटी संघ; विराटला दिला डच्चू
‘या’ सामन्यात माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा दिसणार मैदानात चौकार- षटकार ठोकताना