टोकियोमध्ये सध्या ऑलिंपिक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत रविवारी (१ ऑगस्ट) स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चीनच्या हे बिंग जिआओला पराभूत करत कांस्यपदकाला गवसणी घातली. भारताचे टोकियो ऑलिंपिकमधील हे दुसरे पदक ठरले. कांस्यपदकाच्या लढतीत विजय मिळवल्यानंतर काय भावना होत्या, याबद्दल आता सिंधूने खुलासा केला आहे.
सिंधूचे कारकिर्दीतील दुसरे ऑलिंपिक पदक ठरले. २०१६ साली रिओ ऑलिंपिकमध्ये तिने रौप्य पदक मिळवले होते. त्यामुळे सिंधू ऑलिंपिकमध्ये २ वैयक्तिक पदकं मिळवणारी दुसरीच भारतीय खेळाडू ठरली आहे. यापूर्वी कुस्तीपटू सुशील कुमार याने असा कारनामा केला होता. तसेच सिंधू ऑलिंपिकमध्ये २ वैयक्तिक पदकं मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
तिने रविवारी जेव्हा सामना जिंकला, तेव्हा तिला काहीच सुचत नव्हते, असे तिने सांगितले आहे. याच संदर्भात पीव्ही सिंधू म्हणाली की, ‘मी कांस्य पदकासाठी जेव्हा लढत होते, अंतिम गुण जिंकले, तेव्हा अक्षरशः मला काहीच समजत नव्हते, मला काहीच सुचत नव्हते. तो खूप मोठा क्षण होता. मी सामन्यानंतर माझ्या प्रशिक्षकांना भेटले, त्यांनीही योगदान दिले होते. पहिल्या ५-६ सेंकदानंतर, मी भान येऊन जल्लोष केला.’
त्याचबरोबर ती म्हणाली की, “मी खूप आनंदी आहे आणि अर्थातच, देशासाठी पदक मिळवणे हा एक अभिमानास्पद क्षण आहे. या अगोदर रिओमध्ये जिंकलेले रौप्य पदक होते आणि आता हे कांस्य पदक आहे. मी पदक जिंकू शकले यासाठी मी खूप आनंदी आहे.”
बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने सोमवारी आयोजित केलेल्या आभासी पत्रकार परिषदेत सिंधूने सांगितले की, “ठीक आहे, उपांत्य फेरीनंतर, मी थोडी दु: खी झाले होते. माझे प्रशिक्षक आणि फिजिओने मला समजावून सांगत होते की, अजून तुझी कारकीर्द संपली नाही. आणखी खूप खेळायचे आहे आणि देशासाठी खूप पदके जिंकायचे आहेत. या फेरीनंतर मला खरंच समजत नाही की, मी दु: खी व्हावे की मी आनंदी होऊ. माझ्या भावना संमिश्र होत्या.” सिंधूला उपांत्य फेरीत पराभव स्विकारावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“मला समजत नाही की क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी इतके उतावीळ का आहोत?”