भारत-पाकिस्तान सामना क्रिकेटप्रेमींसाठी नेहमीच चूरशीचा आणि रोमांचकारी राहिला आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघातील बरेचसे सामने अविस्मरणीय ठरले आहेत. या दोन संघातील 1999 ला झालेल्या कसोटी मालिकेच्या आठवणींना नुकताच पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वासिम अक्रमने उजाळा दिला आहे.
त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉट्सनबरोबर ‘लेसन लर्न विथ द ग्रेट’ पोडकास्टमध्ये बोलताना सांगितले की पाकिस्तानचा 1999 चा भारत दौरा त्याचा आवडता आहे कारण बऱ्याच वर्षांनंतर पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता आणि पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने विजय देखील मिळवला होता.
अक्रम म्हणाला, ’90 च्या दशकात आम्ही भारताविरुद्ध खूप काही जिंकलो. सध्याच्या काळातील गोष्ट वेगळी आहे. ती पूर्णपणे विरुद्ध आहे. मला वाटते वेळ बदलली आहे. जर आपण दौऱ्याबद्दल बोललो तर मी 1999 चा भारत दौरा निवडेल. आम्ही तेव्हा 10 वर्षांनी भारताचा दौरा करत होतो.’
त्या दौऱ्यात अक्रम पाकिस्तानचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईत झालेला पहिला कसोटी सामना पाकिस्तानने 12 धावांनी जिंकला होता. त्यावेळी भारताकडून सचिन तेंडुलकरने शेवटच्या दिवशी शतकही केले होते. परंतू तरीही भारताला पराभव स्विकारावा लागला होता.
याबद्दल बोलताना अक्रम म्हणाला, ‘मी कर्णधार होतो. पहिली कसोटी चेन्नईला होणार होती. मी संघातील खेळाडूंना सांगितले, जर स्टेडियम शांत असेल तर आपण चांगले खेळत आहोत. आपल्याला भारतात पाठिंबा मिळणार नाही आणि भारताला पाकिस्तानमध्ये पाठिंबा मिळणार नाही. ही एक गोष्ट होती.’
‘सक्लेन मुश्ताकने शानदार षटक टाकले होते. ‘दुसरा’ चा शोध त्याने लावला होता. चेन्नईतील प्रेक्षक आमच्यासाठी उभे राहुन टाळ्या वाजवत होते. माझ्यासाठी तो माझा आवडता दौरा होता.’
पुढे अक्रम म्हणाला, ‘नंतर दिल्लीला झालेल्या दुसऱ्या कसोटीत अनिल कुंबळेने एका डावात 10 विकेट्स घेतल्या होत्या. खरंच तो दौरा अविस्मरणीय होता.’
त्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 212 धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत झाली होती. तसेच कोलकाताला झालेला तिसरा कसोटी सामना एशियन टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग होता. हा सामना पाकिस्तानने 46 धावांनी जिंकला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 916 विके्ट्स घेणारा अक्रम पुढे म्हणाला, ‘मी भारत-पाकिस्तान संघांमधील सामन्यांमध्ये असणाऱ्या दबावाची मजा घ्यायचो. मी त्या दबावाला सकारात्मक दृष्टीने पहायचो.’
याबरोबरच अक्रमने असेही म्हटले की 2 दशकांच्या त्याच्या कारकिर्दीत त्याची नेहमीच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करण्याची इच्छा होती.
तो म्हणाला, ‘इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ही अशी दोन ठिकाणे आहेत, जिथे मला चांगली कामगिरी करायची होती आणि भारताविरुद्ध मला वेगळ्या कारणाने चांगली कामगिरी करायची होती. कारण जेव्हा तूम्ही भारताविरुद्ध चांगली कामगिरी करता तेव्हा आम्हाला आमच्या देशात वेगळी ओळख मिळते, असेच भारतातही लागू होते.’
ट्रेंडिंग घडामोडी –
२००३ विश्वचषकातील सामन्यापुर्वी मी दवाखान्यात जाऊन गुडघ्यातील पाणी काढून आलो होतो
आता क्रिकटर्सला रहावे लागणार पत्नींपासून दूर; बोर्डाने सांगितले कारण…
इंग्लंडची ही खेळाडू म्हणते, अर्जून तेंडूलकरला माझ्या डोक्यावर चेंडू मारायचा आहे