सोमवारी (११ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ मधील ५८ वा आणि प्लेऑफमधील एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स आमने सामने होते. कोलकाता नाइट रायडर्सने या सामन्यात चार विकेट्सने विजय मिळवला. केकेआरचा दिग्गज फिरकी गोलंदाज सुनील नरीनने संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. सुनीलने या सामन्यात आरसीबीच्या महत्वाच्या चार विकेट्स घेतल्या. सुनीलच्या या कामगिरीनंतर सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. अशातच माजी दिग्गज क्रिकेटपटू वसीम जाफर याने ट्वीटरवर सुनीलविषयी एक मजेदार मीम शेअर केले आहे. चाहत्यांना त्याने शेअर केलेले हे मीम खूपच आवडले आहे.
बेस्ट मीम मेकर जाफर
वसीम जाफर नेहमीच सोशल मीडियावर सतर्क असतो आणि चाहत्यांसाठी सतत मजेदार मीम शेअर करतो. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सुनीलने केलेल्या कामगिरीनंतरही त्यांनी एक खास ट्वीट केले आहे. सुनीलने या सामन्यात आरसीबीचे चार महत्वाचे विकेट्स घेतले असून यामध्ये कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल आणि मागच्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या श्रीकर भरतचा समावेश होता. सुनीलच्या गळाला सामन्यात हे चार मासे लागले असल्यामुळे जाफरने याच आशयाचे एक मीम शेअर केले आहे. त्यांनी शेअर केलेल्या मीममध्ये एक मासे पकडणारा दिसत असून त्याला एकाच प्रयत्नात चार मासे मिळाल्याचे दिसत आहे.
Sunil Narine tonight. #RCBvKKR #IPL2021 pic.twitter.com/fB7kzqw3Js
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) October 11, 2021
जाफरने शेअर केलेले हे मीम चाहत्यांच्या पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. त्याने शेअर केल्या या मीममधून कालच्या सामन्यात जे घडले ते स्पष्ट होते आणि जास्त काही स्पष्टीकरणाची आवश्यकता राहिली नाही. चाहते त्याच्या या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीनीं तर जाफरला बेस्ट मीम मेकर करार दिला आहे.
केकेआरचा रोमहर्षक विजय
दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीला आरसीबीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, फलंदाजीमध्ये आरसीबीला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही. आरसीबीने मर्यादित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या बदल्यात १३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, केकेआरने १९.४ षटकात ६ विकेट्सच्या बदल्यात १३९ धावा केल्या आणि सामन्यात विजय मिळवला. सुनील नरीनला मॅन ऑफ द मॅच निवडले गेले.






