रोलँड गर्रोस अर्थात फ्रेंच ओपनच्या उपांत्य सामन्यात काल अग्रमानांकित अँडी मरेला पराभूत करून स्विझरलँडच्या स्टॅन वावरिंकाने अंतिम सामन्यात धडक मारली. आता त्याचा सामना ‘किंग ऑफ क्ले’ असलेल्या स्पेनच्या राफेल नादलशी होणार आहे. नादालने फ्रेंच ओपन स्पर्धा विक्रमी ९ वेळा जिंकली आहे. मागील बारा वर्षात नदाल सोडून केवळ ३ जण ही स्पर्धा जिंकले आहेत.
२००९ – रॉजर फेडरर
२०१५ – स्टॅन वावरिंका
२०१६ – नोवाक जोकोविच
‘स्टॅनिमल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वावरिंकाने आपला प्रतिस्पर्धी अँडी मरेला ६-७(३), ६-३, ५-७, ७-६(३), ६-१ असे हरवत ३ वर्षात दुसऱ्या फ्रेंच ओपन अंतिम सामन्यात धडक मारली. २०१५ साली जोकोविचला हरवत त्याने फ्रेंच ओपनचा किताब आपल्या नावे केला होता, मात्र २०१६ साली अँडी मरे समोर तग न धरू शकल्यामुळे उपांत्य सामन्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला होता.
या आधी १९७३ साली निकी पिलिक फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात खेळणारे सर्वात वयस्कर खेळाडू होते, आणि आता त्यांच्या पाठोपाठ वावरिंका देखील या यादीत जोडला गेला आहे. ३२ वर्षीय वावरिंका हा पिलिकनंतरचा सर्वात वयस्कर खेळाडू आहे.
पिलिक १९७३ चा सामना हरले होते मात्र वावरिंका काही वेगळी जादू करू शकेल का..? असे झाले तर वावरिंका फ्रेंच ओपन जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरेल.