वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानचा अनुभवी फिरकीपटू सईद अजमलच्या घातक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शरणागती पत्करली. अजमलने केवळ 16 धावा देत तब्बल 6 विकेट्स घेतल्या. त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून ऑस्ट्रेलिया केवळ 74 धावांत गारद झाला. पाकिस्तानने हे लक्ष्य अवघ्या 47 चेंडूत आणि 10 विकेट राखून सहज गाठले.
टॉस जिंकून पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस बोलावले. मात्र ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. नियमित अंतराने गडी बाद होत राहिले. संपूर्ण संघातील केवळ दोनच फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले. कर्णधार बेन डंकने सर्वाधिक 26 धावा केल्या, तर कॅलम फर्ग्युसनने 10 धावांचे योगदान दिले. संपूर्ण संघ 11.5 षटकांत 74 धावा करून माघारी परतला. अजमलने 3.5 षटकांत 16 धावांत 6 विकेट्स घेतल्या, तर इमाद वसीमने 2 विकेट्स घेतल्या.
75 धावांचे सोपे लक्ष्य पाकिस्तानच्या सलामीवीरांनी धडाकेबाज खेळ करत गाठले. शरजील खान (नाबाद 32 धावा, 23 चेंडू) आणि सोहेब मकसूद (नाबाद 28 धावा, 26 चेंडू) यांनी 75 धावांची अपराजित भागीदारी करीत संघाला अवघ्या 7.5 षटकांत विजय मिळवून दिला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या जॉन हेस्टिंग्सने आपल्या गोलंदाजीने चर्चेत स्थान मिळवले. त्याने 5 चेंडूंच्या स्पेलमध्ये तब्बल 19 धावा दिल्या आणि 12 वाइड चेंडू टाकले.
या शानदार विजयामुळे पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. शोएब मलिकच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने लीग स्टेजमध्ये 4 सामने जिंकले, तर भारताविरुद्धचा सामना रद्द झाला. पाकिस्तानने दणक्यात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.






