भारतीय पुरुष संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ जिंकला आणि सगळ्यांनी संजू सॅमसनवर कौतुकांचा वर्षाव केला. त्याने मात्र त्याचा साथीदार अभिषेक शर्माचे कौतुक करताना त्यांची भागीदारी किती संतुलित आणि सोपी असल्याचे सांगितले आहे. त्याने त्यांच्या जोडीचे वर्णन एका वेगळ्याच प्रकारे केले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यात संजू-अभिषेक जोडीने भारताला उत्तम सुरूवात करुन दिली होती. त्यांनी ९८ धावांची भागादारी केली होती. यामध्ये अभिषेकने १८ चेंडूतच अर्धशतक केले होते आणि संजूने ४६ चेंडूत ८९ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने २० षटकात ५ विकेट्स गमावत २५५ धावसंख्या उभारली . त्यानंतर यजमानांनी न्यूझीलंडला १५९ धावसंख्येवरच रोखले आणि ९६ धावांनी मोठा विजय मिळवला. त्याचबरोबर भारताने तिसरा टी२० विश्वचषक जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली.
या स्पर्धेत संजूने त्याच्या आणि अभिषेकच्या जोडीला ‘आग आणि आग’ असे संबोधले आहे. तसेच त्या दोघांनी वेळोवेळी आक्रमकपणे कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका कशी पार पाडली, हे पण स्पष्ट केले आहे. तो एका कार्यक्रमावेळी बोलत होता. त्यामध्ये त्याने अभिषेकसोबतच्या भागीदारीचे वर्णन केले आहे.
“आम्ही आग आणि बर्फ नाही, आम्ही आग आणि आग आहोत. कधी तो आक्रमक खेळतो, तर कधी मी. आमच्यात अशा प्रकारचे संयोजन चालू आहे. हे आम्ही २०२४ पासून करत आहोत. आमच्या मैत्रीमध्ये ‘केरळी-पंजाबी’ मिश्रण आहे. आमच्यासाठी सर्व काही अगदी सहजपणे घडते, त्यामुळे आम्ही त्यात उगाचच गुंतागुंत निर्माण करत नाही.” असेही संजूने अभिषेकसोबतच्या भागीदारीबाबत म्हटले आहे.
“‘तो मला विचारतो, बॅटवर बॉल कसा येतो?’ मी त्याला सांगतो की चेंडू सामन्यपणे येत आहे आणि त्यावर षटकार मारतो. त्याच्यासोबत हे खूप सोपे आहे. अभिषेक खूप धाडसी आणि संयमी आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर मला त्याच्यासोबतची भागीदारी खूप आवडते,” असेही संजू पुढे म्हणाला आहे.
टी२० विश्वचषकात संजू पहिले काही सामने बाकावर होता. नंतर त्याला ५ सामने खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने ८०.२५च्या सरासरीने आणि १९९.३७च्या स्ट्राईक रेटने ३२१ धावा केल्या. या स्पर्धेच्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.






